भोकर (नांदेड ) : शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये लसणाच्या कारणावरुन दोन गटांत झालेल्या मारहाणीत ४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडल्यानंतर रात्री उशीरा भोकर पोलिसांत १० जणांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत चंद्रकांत बिल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद नोंदविण्यात आला. सपोनि सुशील चव्हाण तपास करीत आहेत. दुसरी फिर्याद निशादखान आयुबखान पठाण यांनी दिली. आरोपी अशोक उल्लेवाड रा.नागापूर, राहुल मेक्यानिक (रा.हस्सापूर), सुरेश बिल्लेवाड, माधव बिल्लेवाड (रा.रायखोड) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सपोनि सुरेश भाले हे तपास करीत आहेत. हाणामारीत जखमी झालेल्या चंद्रकांत बिल्लेवाड, रमेश बरबडकर आणि अर्शद अली सादक अली, निशादखान अयुबखान पठाण यांच्यावर नांदेड येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीमुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्तात्रय वाळके, पो.नि. आर.एस.पडवळ यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने अनर्थ टळला.
लोखंडी गजाचा झाला वापर भोकर येथील भाजीपाला मार्केटमध्ये चंद्रकांत गंगाधर बिल्लेवाड (रा.रायखोड) यांनी २५० गॅ्रम लसूण विकत घेतले तेव्हा लसूण कमी - जास्त, देण्याघेण्यावरुन झालेल्या वादातून यातील आरोपी अनिश रशिद बागवान, निशादखान अयुबखान पठाण, अर्शद अली सादक अली सय्यद, सय्यद रिजवान अली सय्यद यांनी संगनमत करुन चंद्रकांत बिल्लेवाड व रमेश बरबडकर यांना लोखंडी गजाने मारुन जखमी केले तसेच विठ्ठल पोपूलवाड,पांडुरंग शिंदे यांनाही मारहाण केली.