जेवणाच्या पंगतीतून मोबाईल लंपास
नांदेड - गावातील एका लग्नसोहळ्यात गेलेले असताना लग्नाच्या पंगतीत वऱ्हाड्याचा १८ हजार रुपयाचा मोबाईल लंपास करण्यात आला. ही घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रभाकर परसराम क्षीरसागर हे गावातील एका लग्नसोहळ्यासाठी कामठा येथे गेले होते. लग्न आटोपल्यानंतर ते जेवणाच्या रांगेत उभे होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल लांबविला. या प्रकरणाचा तपास सपोउपनि वाघमारे हे करीत आहेत.
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड - दिसायला चांगली नाही, घरखर्च करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. मुंबई आणि पावडेवाडीच्या जिजाऊनगर भागात ही घटना घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने पीडितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात विवाहितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इंजेगावात जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड - किनवट तालुक्यातील मौजे इंजेगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या कल्याण-मिलन नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी जुगाराच्या साहित्यासह दोन हजार रुपये जप्त केले. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.