लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदाेन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात तब्बल ४६ हजार ९६२ जागा जिल्हा परिषदांमधील आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल पांडुरंग ठाकरे यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला रिक्त जागांबाबत माहिती मागितली हाेती. गेल्या १५ वर्षांत किती जागा भरल्या गेल्या, सध्या किती रिक्त आहेत, अशी विचारणा केली गेली. त्याचा अहवाल ६ सप्टेंबर २०२१ राेजी विशाल ठाकरे यांना प्राप्त झाला. त्यात रिक्त पदांचे हे वास्तव पुढे आले. शासनाने केवळ २९ विभागांची माहिती दिली. नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका, मंडळ, महामंडळे, उद्याेग व इतर विभागांची माहिती दिली गेली नाही. रिक्त पदांमुळे नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवा प्रभावित हाेत आहेत. तहसील कार्यालयात साध्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठीही विद्यार्थी व पालकांना किमान दाेन आठवडे प्रतीक्षा करावी लागत आहे.
आउटसाेर्सिंग, कंत्राटीवर जाेर
राज्यात बेराेजगारी प्रचंड वाढली आहे. तरुणांना नाेकऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र, शासनाचा नव्या नाेकरभरतीऐवजी आउटसाेर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जाेर दिसताे. त्यातूनच निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात आहे.
‘एमपीएससी’ची संथगती
सरळसेवा भरतीबाबतही राज्य लाेकसेवा आयाेगाची संथगती पहायला मिळते. काॅललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागताे आहे. २०१८ला फाैजदार पदासाठी आयाेगाने जाहिरात काढली. २०१९ला निवड झाली. मात्र, दीड-दाेन वर्षांनंतर २०२१मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे.
सर्वाधिक रिक्त जागा गृहविभागात
रिक्त असलेल्या दोन लाख पदांपैकी सर्वाधिक २४८७८ पदे एकट्या गृहविभागात आहेत. त्या खालाेखाल जलसंपदा २० हजार ८७३, तर सार्वजनिक बांधकाम विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत. मृदा व जलसंधारण विभागात एकही पद रिक्त नसल्याची माहिती देण्यात आली. रिक्त पदे २ लाख १९३ पदे सरळसेवेची रिक्त पदे १ लाख ४१ हजार ३२९ पदोन्नतीची रिक्त पदे ५८ हजार ८६४
जिल्हा परिषदांतील स्थिती
रिक्त पदे ४६,९६२ सरळसेवेची रिक्त पदे ४२,९७१ पदोन्नतीची रिक्त पदे ३,९९२
वर्गवारीनुसार रिक्त पदे
अ वर्ग - १० हजार ५४४ब वर्ग - २० हजार ९९९क वर्ग - १ लाख २७ हजार ७०५ड वर्ग - ४० हजार ९४४एकूण - २ लाख १९३
शासकीय सेवेतील पदे
विभाग - २९ एकूण पदे - १०,९९,१०४ सरळसेवेची पदे - ७,८०,५२३ पदे पदोन्नतीची पदे - ३,१८,५८१ भरलेली एकूण पदे - ८,९८,९११