भारत जोडो यात्रेतील दोघांना ट्रकने उडविले; एकाचा मृत्यू, अशोक चव्हाणांची रुग्णालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 08:22 AM2022-11-11T08:22:31+5:302022-11-11T08:26:30+5:30
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता.
विष्णुपुरी (नांदेड) : भारत जोडो यात्रेतील दोघांना आयचर (ट्रक) वाहनाने उडविले. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी असलेल्या यात्रीची विचारपूस केली.
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरात आयोजित जाहीर सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. दरम्यान, रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला हायवेवर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन (६२) आणि सययुल (३०) या दोन यात्रेकरुना आयचरने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गणेशन (६२) यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी यात्रीवर उपचार सुरू आहेत.
अशोक चव्हाण तत्काळ रुग्णालयात
या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठले. रात्री साडेबारा वाजेपर्यंत चव्हाण हे रुग्णालयात होते. परंतु, डोक्याला जबर दुखापत झालेल्या भारत जोडो यात्रीला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही.