लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण नांदेडात आढळले आहेत़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़ सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असून नांदेडातील दोन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह निघाले़ शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूवर उपचारासाठी विशेष कक्ष उघडण्यात आला आहे़चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे शेकडो रुग्ण आढळले होते़ स्वाईनची लक्षणे आढळलेल्या रुग्णांसाठी जुन्या रुग्णालयात वेगळा कक्ष उभारण्यात आला होता़ या ठिकाणी नांदेड, हिंगोली आणि परभणी येथील जवळपास दहांहून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़या सर्व रुग्णांनी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यानंतरही उपचारासाठी विलंब केल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती़ त्यानंतर जिल्हा प्रशासनाने स्वाईन फ्लूच्या संदर्भात व्यापक जनजागृती मोहीम राबविली होती़ त्यामुळे गेल्या काही वर्षांत स्वाईनचे रुग्ण आढळले नव्हते़ आता पुन्हा एकदा स्वाईनने डोके वर काढले आहे़नांदेडच्या शेजारील जिल्ह्यांतही असे रुग्ण आढळत आहेत़ दरम्यान, बारड येथील श्रद्धा नागनाथ काटेवाड या दहा वर्षीय चिमुकलीसह लातूर जिल्ह्यातील जळकोटी येथील सुनीता रोहिदास सोनकांबळे (वय २८) या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़या दोन्ही रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत़ दरम्यान, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विशेष कक्ष उघडण्यात आला आहे़ या कक्षासाठी डॉक्टर आणि परिचारिकांचे वेगळे पथकही तयार करण्यात आले आहे़ ढगाळ वातावरण हे स्वाईनच्या विषाणूसाठी पोषक मानले जाते़ गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे़ त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे़
अशी आहेत स्वाईन फ्लूची लक्षणे...ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी आहे. या औषधींचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे.टॅमी फ्ल्यू या गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा रुग्णालयाकडे आहे़ २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आला होता़