श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : माहूर गाढावरील श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदोरी (न्याज) करण्यासाठी जात असताना वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून १३ भाविक जखमी झाले. आज शुक्रवारी (दि. २२ ) सकाळी १०. ३० वाजता घडलेल्या या अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या मौजे वाकान कोंदरी येथील चार परिवारातील भाविक दर वर्षी प्रमाणे शेख फरीद दर्गाह येथे कंदोरी (न्याज) करण्यासाठी सकाळी आॅटो (क्ऱएम़एच़२९-८८६१) व एक टाटा टेम्पो घेऊन निघाले होते. ऑटोत १३ भाविक आॅटो चालकासह तर टेम्पोत १५ भाविक प्रवास करीत होते़ टेम्पो शिखर घाटातून पुढे निघून गेला तर ऑटो मागून घाटातून हळूहळू जात होता.
घाटातील शेवटच्या वळणावर चालक सै़जैनूल्ला खान (वय २०) याचा आॅटोवरील ताबा सुटल्याने ऑटोने दोन पलट्या खाल्ल्या़ यात बसलेले सैक़रीम सै़सलीम (वय १९) व शे़अल्ताफ शे़मौला या दोघांना गंभीर मार लागला़ उत्तम लोंढे (वय ६०), अरुण वंजारे (वय ५३), शेग़फुरला शे़ बाबाअली (वय ५०), शे़रफिक शे़ फरीद (वय ४३), सै़हुसेन सै़छोटू (वय ४०), राजू घड्याळे (वय ३२), सुनील वंजारे (वय २३), गजानन घड्याळे (वय ३३), पांडुरंग लोंढे (वय ५०), शे़शोएब शे़अखतर (वय १७) हे किरकोळ जखमी झाले आहेत़
वझरा येथे कामानिमित्त जात असलेले सुजाण भारती यांनी घटना पाहून दोन्ही गंभीर जखमींना आपल्या मोटारसायकलवरून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आणि त्यांच्या पुढे गेलेल्या भाविकांना घटनेची माहिती दिली़ त्यामुळे दुसऱ्या वाहनाने उर्वरीत भाविकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालयात डॉ़वाघमारे व परिचारिका यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी दोघांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले़ इतर भाविकांना उपचार करून सुट्टी देण्यात आली़ रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे़