नांदेड : प्रवाशांच्या सुविधेसाठी दक्षिण-मध्य रेल्वे आणखी दोन विशेष गाड्या चालवत आहे. या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित असून, अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
गाडी संख्या ०७६१८ नांदेड ते मुंबई विशेष एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हुजूर साहिब, नांदेड येथून सकाळी १०.०५ वाजता सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे मुंबई सी. एस. एम. टी. येथे रात्री ११.५५ वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०७६१७ मुंबई ते नांदेड विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत मुंबई सी. एस. एम. टी. येथून सकाळी ६.१५ वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणीमार्गे हुजूर साहिब, नांदेड येथे सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. या गाडीला १८ डब्बे असतील.
गाडी संख्या ०२७३० नांदेड ते पुणे विशेष एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत नांदेड येथून रात्री ९.४० वाजता सुटून परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे पुणे येथे सकाळी ९.४० वाजता पोहोचेल.
गाडी संख्या ०२७२९ पुणे ते हुजूर साहेब, नांदेड विशेष एक्स्प्रेस २७ जानेवारीपासून पुढील आदेश मिळेपर्यंत पुणे येथून रात्री १० वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, परभणीमार्गे नांदेड येथे सकाळी १० वाजता पोहोचेल. या गाडीला १७ डब्बे असतील. या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.