नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषीपंपधारक चालू देयक भरणार नाहीत, अशा कृषीपंप वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई आजपासून हाती घेण्यात आली आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषीपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.
नांदेड परिमंडळांतर्गत असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीज क्षेत्रामध्ये उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीज देयकांची वसुली होणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीनेच आता कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले आहे़. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषीपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.
नांदेड परिमंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीनही जिल्ह्यांमध्ये कृषीपंप धारकांची वीजदेयक वसुली मोहीम कठोरपणे राबवली जाणार आहे. परिमंडळामध्ये एकूण २ लाख ८६ हजार ८०१ कृषीपंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर २ हजार १६२ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १ लाख २३ हजार २२० ग्राहकांकडे ८९८ कोटी ५८ लाख रुपयांची तर परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८८० ग्राहकांकडे ७५० कोटी ३३ लाखांची आणि हिंगोली जिल्ह्यातील ७० हजार ७०१ ग्राहकांकडे ५१४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कृषीपंप वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी दोन त्रैमासिक वीजबिलाची रक्कम त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
कपॅसीटर बसवले तरच रोहित्र बदलून मिळेल
४नांदेड परिमंडळाची थकबाकी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करुन त्वरित वीजबिल भरावे. कृषीपंप धारक वीज ग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरुस्त करण्यापूर्वी संबंधित कृषीपंप वीज ग्राहकांनी कृषीपंपावर योग्य क्षमतेचा कपॅसीटर बसवला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतरच नवीन रोहित्र देण्यात येईल- अविनाश पोटोळे, मुख्य अभियंता, नांदेड़