भाविकांची रोख रक्कम अन् साहित्य लंपास
नांदेड : पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेले काही भााविक लोहा शहरात एका मंदिरात विश्रामासाठी थांबले होते. यावेळी चोरट्याने त्यांच्याजवळील रोख २० हजार रुपये आणि मोबाइल लंपास केला. या प्रकरणात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दादा भाऊराव कडू, रा. कोचरवाड, ता. हिंगणघाट हे कुटुंबीयासह पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. ११ फेब्रुवारी रोजी लोहा येथे आले. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. त्यामुळे रात्रभर या ठिकाणी मुक्काम करून सकाळी निघण्याचा त्यांचा बेत होता. लोहा शहरातील शनी मंदिरातील मोकळ्या जागेवर सर्वांनी पाठ टेकली. थोड्याच वेळात त्यांना गाढ झोप लागली. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या उशीखाली ठेवलेले रोख २० हजार रुपये आणि १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. सकाळी कडू यांना प्रकार लक्षात आला. या प्रकरणाचा तपास पोना. कदम करीत आहेत.
बीएसएनएल कंपनीचे साहित्य चोरीला
नांदेड : किनवट तालुक्यातील धानोरा घाटात असलेल्या बीएसएनएल टॉवरमधील एक लाख रुपयांच्या बॅटरी चोरट्याने लंपास केल्या. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. चोरट्याने सेल्टबॉक्समधील अमर राजा कंपनीच्या १ लाख रुपये किमतीच्या २२ बॅटऱ्या लंपास केल्या. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड : बांधकामासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे घडली. पीडितेला पैशाच्या मागणीसाठी मारहाण करून घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना. बंडेवार करीत आहेत.
व्यापाऱ्याच्या १४ म्हशी परस्पर विकल्या
नांदेड : शहरातील नवीन मोंढा भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या १४ म्हशी आरोपीने परस्पर विक्री केल्या आहेत. बसवेश्वर अंबेश्वर स्वामी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीने विश्वासघात करून त्यांना न सांगताच म्हशीची विक्री केली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चौदा वर्षीय बालकाला पळविले
नांदेड : लोहा शहरातील शिवक कल्याणनगर येथून एका १४ वर्षीय मुलाला पळवून नेण्यात आले. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली. मुलाला अज्ञात आरोपीने कोणत्या तरी कारणावरून पळविले. या प्रकरणात ऑटोचालक गोविंद हाके यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.