नांदेड :
तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरचा पायी प्रवास... १५० दिवसांचा मुक्काम. राज्यपरत्वे बदलणारे हवामान, जंगल, डोंगरदऱ्या आदींचा अभ्यास करून ‘भारत जोडो’ यात्रेचा रोड मॅप बनविला आहे, तो काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी. त्यामुळेच त्यांना खासदार राहुल गांधीची टीम ‘भारत जोडो’चे आर्किटेक्ट म्हणून संबोधतात.
देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन करताना दररोजचे पायी चालत जाणारे अंतर, होणारे मुक्काम आदी बाबींचा विचार करून रोड मॅप बनविण्यात आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह यांनी या यात्रेचे नियोजन केले आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करत ही यात्रा देशाच्या वरच्या टोकाला असलेल्या श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकावूनच थांबेल, असा विश्वास काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. कोणतीच शक्ती- आंधी या यात्रेला रोखू शकत नाही, असे ते सांगतात.
१५० दिवसांची पदयात्राखासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाली असून, आजपर्यंत ६३ मुक्काम झाले आहेत. १५० दिवसांच्या पदयात्रेत देशभरातील १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.
मराठवाडा- विदर्भाला दिले प्राधान्य भारत जोडो यात्रेचा मॅप तयार करताना महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील वाशीम, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांतून ही यात्रा जात आहे. राज्यात काँग्रेसची पीछेहाट होत असताना नांदेड जिल्ह्याने नेहमीच काँग्रेसची साथ दिली आहे. राज्यातील एकूण २८८ पैकी ४४ जागी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. त्याच मार्गाने अथवा विधानसभा मतदारसंघातून भारत जोडो यात्रा जात असल्याने निश्चितच विद्यमान आमदारांना फायदा होईल, असे मानले जात आहे.