किरकोळ कारणावरून व्यापाऱ्याला मारहाण
नांदेड- किरकोळ कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मारवाड गल्ली भागात घडली. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घर तोडफोडीचे साहित्य टाकल्याच्या कारणावरून वाद घालून सुयोग नवलकुमार बाकलीवाल या व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
एक लाखासाठी विवाहितेचा छळ
माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना कंधार तालुक्यातील हाळदा येथे घडली. शेतात विहीर करण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. तसेच उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलण्यात आले. याप्रकरणात हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पानटपरीत सुरू होता मटका
हदगाव तालुक्यातील तामसा येथे शिवाजी चौकातील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या एका पानटपरीत मटका जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणी १२ मार्च रोजी कारवाई केली. यावेळी दोन हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पो.ना. शिवाजी जानकर यांच्या तक्रारीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतात ठेवलेली दारू पकडली
उमरी तालुक्यातील मौजे सिंधी येथे शेताजवळ कॅनॉल परिसरात ठेवण्यात आलेली अडीच हजार रुपयांची देशी दारू पकडण्यात आली. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ही दारू ठेवण्यात आली होती. या प्रकरणात उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर किनवट तालुक्यातील जावरला येथे दोन हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.