वजिराबाद भागात मोबाईल लंपास
नांदेड : शहरातील वजिराबाद भागात किंग कलेक्शन कापड दुकानासमोर एका महिलेचा मोबाईल लंपास करण्यात आला. शितल साईनाथ हंगरगे या किंग कलेक्शनमधून मास्क खरेदी करून बाहेर पडल्या होत्या. यावेळी त्यांच्या हातातील पर्समध्ये असलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने उडविला. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
रेती वाहतूक करणारी ट्रॉली जप्त
नांदेड : माहूर तालुक्यात दिगडीते हिंगणी पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करुन वाहतूक करणारी ट्रॉली पकडण्यात आली. ही कारवाई १० जानेवारी रोजी करण्यात आली.पोलिसांनी दोन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास रेती आणि४० हजार रुपये किमतीची ट्रॉली जप्त केली आहे. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
नांदेड : मुखेड तालुक्यातील एका विवाहितेचा पैशाच्या मागणीसाठी छळ करण्यात आला. दिसायला चांगली नाहीस, आम्हाला पसंत नाहीस असे म्हणून विवाहितेला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.