स्वयंपाक येत नसल्याने छळ
नांदेड : विवाहितेला स्वयंपाक चांगला येत नसल्याच्या कारणावरून त्रास देऊन घराबाहेर हाकलण्यात आले. ही घटना धर्माबाद तालुक्यातील संगम येथे घडली. या प्रकरणात सासरच्या मंडळींच्या विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडित विवाहितेला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी पूर्ण होत नसल्याने वेगवेगळ्या कारणांवरून पीडितेला त्रास देण्यात आला. तसेच घराबाहेर हाकलून देण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत देगलूर तालुक्यातील वझरगा येथे पतीला नोकरीला लावण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. तर विष्णूपुरी भागात फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवण्यात आले. तसेच अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
सारखणी येथे जुगार अड्ड्यावर धाड
माहूर तालुक्यातील मौजे सारखणी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. १ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. या वेळी रोख चार हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात पो.उपनि. शरद घोडके यांच्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.