गवंडगाव येथे फवारणी
देगलूर : तालुक्यातील गवंडगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी सुरू करण्यात आली. सरपंच बालाजी पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला. या अंतर्गत रस्ते, नाली स्वच्छ करून धूळ फवारणीचा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी सुनील कोकनारे जनजागरण करीत असून, याकामी मधुकर नरवाडे, माणिक टेकाळे, पंडित टेकाळे, संदीप बिरादार, संजय नाईक, सायलू नागपुडे, पिंटू लुटे, आदींनीही पुढाकार घेतला आहे.
शिवभोजनाचा आधार
नायगाव : कोरोना ब्रेक द चेन अंतर्गत नायगाव बाजार परिसरात संचारबंदी सुरू आहे. यामुळे नागरिक व मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शिवभोजन थाळी दिली जात आहे. तीन दिवसांपासून दररोज १५० शिवभोजन थाळी वाटप करण्यात येत असल्याचे केंद्र संचालक श्रीनिवास टोकलवाड यांनी सांगितले.
अवैध दारू विक्री
भोकर : तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. याशिवाय रसायनमिश्रित शिंदी, गुटखा, मटका सुरू आहे. संबंधित अधिकारी नाममात्र कारवाई करतात. नंतर परिस्थिती जैसे थे होते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
मोरे यांना श्रद्धांजली
नांदेड : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गंगाधर मोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विजय भोगेकर, बालाजी पांडागळे, जी. एस. मंगनाळे, जी. एन. जाधव, बाबूराव मांडगे, विनायक कल्याणकस्तुरे, बळिराम फाजगे, युसुफ शेख, जे. डी. कदम, एस. एस. पाटील, राजकुमार बावस्कर, केशव कदम, नागनाथ दाभणे, अरुण वडजे, दशरथ मेकाले, आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम
हिमायतनगर - सवना (ज.) येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दहा लाखांचा निधी सभागृहासाठी दिला होता. सांस्कृतिक सभागृहाची मागणी पुजारी मुसाळे यांच्यासह पं. स.चे माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन सभागृहाचे बांधकाम करण्यात आले.
बीएसएनएल सेवा बंद
उमरी : तालुक्यातील बीएसएनएलची सेवा पुन्हा एकदा बंद पडली. नेहमीचीच ही अडचण झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. बीएसएनएलचे काही अधिकारी खासगी मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक सेवा बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. दर महिन्याच्या १५ ते २५ तारखेपर्यंत बीएसएनएलची सेवा विस्कळीत केली जाते. दुसरीकडे ही सेवा वरूनच बंद आहे असे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
जाधव यांना श्रद्धांजली
नांदेड : रा. स्व. संघाचे श्रीरंग जाधव यांना एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्कार भारती नांदेडच्या जिल्हाप्रमुख शर्वरी सकळकळे यांनी जाधव यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी अध्यक्ष भारत लोळगे, कार्याध्यक्ष भगवानराव देशमुख, प्रांत सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव प्रा. डॉ. जगदीश देशमुख, प्रा. डॉ. अरविंदराव देशमुख, संजय जोशी, स्नेहल पाठक, डॉ. दीपक कासराळीकर, अध्यक्ष दिगंबरराव देशमुख, सचिव डॉ. प्रमोद देशपांडे, आदी उपस्थित होते.
६२ गुन्हे दाखल
धर्माबाद : तालुक्यातील अवैध दारू विक्रीविरुद्ध पोलिसांनी थेट कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत मागील दीड महिन्याच्या कालावधीत ६२ गुन्हे नाेंदविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
इंटरनेट सेवा विस्कळीत
किनवट : तालुक्यातील शिवणी येथे बीएसएनएलची ओएफसी लाईन वारंवार खंडित होत असल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे कामे खोळंबत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली.
कोविड सेंटरची मागणी
मुक्रमाबाद : येथील आरोग्य केंद्राच्या धूळ खात पडलेल्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी उद्योजक संदीप पंदिलवार यांनी केली. यामुळे परिसरातील बाधित कोरोनाचे रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टळेल आणि रुग्ण बरे करण्यात मदत होईल, असेही पंदिलवार यांनी नमूद केले.
औषध फवारणी
देगलूर : तालुक्यातील खानापूर येथे औषध फवारणी व परिसर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली. यात गावातील काही तरुणांनी परिसर स्वच्छ करून औषध फवारणीचा कार्यक्रम घेतला. यावेळी विजय धनसुरे, मंजुनाथ परबते, बालाजी तुरपवाड, उमाकांत अटकळे, भगवान वानोळे, उमाकांत पाटील, आदींनी पुढाकार घेतला.