भोकर (जि. नांदेड) : येथील नांदेड रस्त्यावर असलेल्या कॅनालवरील पुलावर कार आणि दुचाकीच्या जबर धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. ६) रात्री घडली.
दुचाकीला बसलेली धडक इतकी जबर होती की, त्यात दुचाकीला आग लागली व कार उलटली आणि दुचाकीवरील धनलाल आडे हे हवेत उडून पाण्याचा प्रवाह असलेल्या कॅनालमध्ये पडून वाहून गेले, यातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यातील मृत धनलाल भीमसिंग आडे (वय ६५, रा. कासारपेठ तांडा, ता. भोकर) हे मुलगा कमलसिंग धनलाल आडे (३८) यांसह दुचाकी (एमएच २६ एएम १०९८) वरून भोकरकडे येत होते. दरम्यान, समोरून भरधाव आलेल्या कार (एमएच ३८-७४८०)ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले धनसिंग भीमसिंग आडे हे उडून कॅनालमध्ये पडून त्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर दुचाकीचालक कमलसिंग आडे या अपघातात जखमी झाले. जखमीवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शनिवारी रात्रभर कॅनालच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेतला. या अपघातातील धनलाल भीमसिंग आडे यांचा मृतदेह घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान मिळून आला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळापासून पसार झाला. कारमध्ये कितीजण होते, हे समजू शकले नाही. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील तपास करीत आहेत.