एमआयडीसी भागातील भद्रा ट्रेडिंग कंपनीतील पोत्याचे बंडल चोरट्यांनी लांबविले. ही घटना २१ मे रोजी घडली. मोहन जयराम भानुशाली हे दिवसभर काम केल्यानंतर कुलूप लावून घरी गेले होते. चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी दुकानातील ३५ हजार रुपये किमतीचे पोत्याचे बंडल लांबविण्यात आले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण
जुन्या भांडणाच्या कारणावरून मरशिवणी येथे शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मे रोजी घडली. तुळशीदास सूर्यकांत लुंगारे हे शेतातून परत जात होते. यावेळी आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तुझ्या मेव्हण्याने दुचाकीने कट मारला असे म्हणून वाद घातला. त्यानंतर दोघांनी लुंगारे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्यापाऱ्यावर केला सळईने हल्ला
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्यावर सळईने हल्ला करण्यात आला. २१ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ही घटना घडली. सय्यद मेराज सय्यद मसूद हे रस्त्यावर थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. या ठिकाणी कशाला थांबला म्हणून त्यांनी सय्यद मेराज यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांनी सळईने त्यांना मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
यात्री निवास भागात खंजरने मारहाण
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यात्री निवास भागात एका व्यापाऱ्यावर खंजरने हल्ला करण्यात आला. २१ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. महेंद्रसिंग लालसिंग शहा हे सुपर मार्केटसमोर थांबलेले असताना आरोपीने कमरेजवळ ठेवलेले खंजर काढून त्यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.