हिमायतनगर ( नांदेड) : मराठवाडा-विदर्भ सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी आलेले दोन युवक सेल्फीच्या नादात पाय घसरुन धबधब्यात पडले़ पाणी कमी असल्यामुळे आणि पोहता येत असल्यामुळे दोघे जण बालंबाल बचावले़ धबधब्याच्या दगडावर थांबलेल्या इतरांनी हात देत या तरुणांना पाण्याच्या बाहेर ओढले.
मुगट येथील दोन युवक मंगळवारी दुपारी धबधबा पाहण्यासाठी आले होते़ ते सेल्फी काढण्याच्या नादात दगडावर पाय घसरुन खाली पडले़ यावेळी पाणी कमी असले तरी, प्रवाह वेगात होता़ पाण्यात पडल्यानंतर प्रवाहासोबत ते पोहत पुढे जात होते़ त्याचवेळी थोड्या अंतरावर दगडावर थांबलेल्या काही युवकांना ते दिसले़ तोपर्यंत हे दोन्ही तरुण पोहत इतर तरुण थांबलेल्या दगडाजवळ पोहत आले होते़ यावेळी तरुणांनी लगेच त्यांना हात देत पाण्याबाहेर खेचले़ त्यानंतर थोड्याच वेळात हे तरुण त्या ठिकाणाहून निघून गेले़ त्यामुळे त्यांची नेमकी नावे कळू शकली नाहीत़ बुधवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली.