उमरी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमरी तालुक्यातील गावपुढाऱ्यांचे राजकारण तापले असून भावी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या उमेदवारीबाबत चाचपणीला सुरुवात झाली आहे. उमरी तालुक्यातील सर्व ५८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्या अनुषंगाने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाचे भावी उमेदवार यांची चाचपणी गावातील पुढाऱ्यांनी सुरू केली आहे . ग्रामपंचायतींची निवडणूक ही राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर होत नाहीत. गावातील एकमेकांचे संबंध , जातीय समीकरण यावर बऱ्याच गोष्टी गावपातळीवर अवलंबून असतात . त्यादृष्टीने पॅनल उभे केले जाते . लोकसभा-विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या वेळी एकमेकांच्या विरोधात प्रचार करणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यक्ती व पुढारी गावच्या राजकारणात मात्र आपापले पक्ष गट-तट बाजूला ठेवून पॅनल तयार करतात. नेहमीप्रमाणे याही वेळी ही खेळी सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रत्येक इच्छुक उमेदवार एकमेकांशी चर्चा होऊन संवाद करताना दिसून येत आहेत.
उमरी तालुक्यातील ५८ पैकी २८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार आहेत. महिला सरपंचपदी विराजमान झाल्या तरीही उपसरपंच पदावर असणारी मंडळीच या ग्रामपंचायतीचा कारभार पाहतात. हा आजवरचा अनुभव आहे म्हणून अशा ग्रामपंचायतीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. विशेष म्हणजे उमरी तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीच्या गावची सरपंचपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येथील ग्रामपंचायत निवडणुका चांगल्याच चुरशीच्या व रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.