उमरी : तालुक्यातील धानोरा बु. ग्रामपंचायतीने उमरी - धानोरा - करखेली या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेऊन रस्ता मोकळा केलेल्या नागरिक व शेतकऱ्यांचा सत्कार करून एक आदर्श उपक्रम सुरू केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे धानोरा बु. येथील ग्रामपंचायत, नांदेड जिल्ह्यात चर्चेत आलेली आहे.
धानोरा बु. याठिकाणी अनेक लोकोपयोगी ग्रामविकासाची कामे चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून गावाजवळून जाणारा मुख्य रस्ता असणाऱ्या उमरी - धानोरा - करखेली या रस्त्यावर गावानजीक अनेकांचे अतिक्रमण होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव देशमुख यांनी येथील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला. रस्त्यावरील अडथळ्यांमुळे प्रवासी वाहने, तसेच अतिथींना अडथळा होतो. अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वखुशीने काढून आपल्या गावच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते.
या आवाहनास प्रतिसाद देत सर्वांनी अवघ्या दोन तासांत येथील सर्व अतिक्रमण काढून घेतले. रस्ता मोकळा करून दिला. यासाठी येथील सर्व अतिक्रमणधारकांचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करणयात आला. विनंती केल्याने कोणतेही काम अगदी सहज शक्य होते, हेच यावरून दिसून आले. या सार्वजनिक हिताच्या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खलाळ, तहसीलदार माधवराव बोथीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी नारवटकर आदींनी लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांच्या उपक्रमाचे स्वागत केले.