नांदेड : शहराची सर्व भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शिल्लक असलेले हे पाणी पुढील किमान १00 दिवस पुरेल अशी आशा आहे. जेणेकरुन मे अखेरपर्यंत पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही. परंतु आजघडीला धरणातून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत पाणीउपसा करण्यात येत आहे. हा पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंतच धरण तळ गाठण्याची शक्यता आहे.
सध्या नांदेड शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विष्णूपुरीतून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून चार पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. सकाळपासूनच ही पथके अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी गस्त घालत आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याचे दिसत आहे. गावातील डीपीवरुन नागरिकांनी मोटारी लावून अवैध पाणीउपसा सुरु केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर १३७ फिडर उतरविण्यासाठी प्रशासनाने महावितरणकडे १६ लाख ५0 हजार रुपये भरले आहेत. हे सर्व फिडर उतरल्यानंतर अवैध पाणीउपशाला आळा घालण्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु> इसापूर धरणातून कालव्याद्वारे आसना नदीत पाणी आणण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ते पम्पींग करुन काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. १४ कोटी ८७ लाखांच्या या योजनेसाठी पाईपची खरेदीही झाली असून विहिरीचे काम सुरु झाले आहे. १५ मे पूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याचा मनपाचा संकल्प आहे. त्यासाठी कामाची गती वाढविण्यात आली आहे.
■ शहराला आज दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तो तीन दिवसाआड किंवा सात दिवसाआड करण्याचा विचार अनेकांनी मांडला. परंतु पाणीपुरवठय़ात कपात करणे हा त्यावर तोडगा नाही. > कारण त्यामुळे फार पाणीबचत होणार नाही. या उलट अनधिकृत उपशामुळे पाणीटंचाईत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.
> नागरिकांनीही टंचाईच्या या संकटाची जाण ठेवावी. पाऊस पुढे सरकल्यास गंभीर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. विष्णूपुरीच्या वरच्या भागात असलेल्या एकाही धरणात मुबलक पाणीसाठा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पाणी मिळण्याचीही अपेक्षा नाही. त्यामुळे बांधकामे,गाड्या धुणे यासारखा पाण्याचा अपव्यय टाळावा. आजघडीला दरदिवसाला 0.४0 पाण्याची हानी आहे. ती किमान 0.१0 वर आली तरी, सध्या असलेले पाणी जूनपर्यंत पुरेल. परंतु पाणीउपसा असाच सुरु राहिला अन् उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवन जास्त झाले तर एप्रिल अखेरलाच नांदेडकरांना पाण्यासाठी भटकंती करावयाची वेळ येणार आहे. त्यात निसर्गानेही जूनमध्ये कृपादृष्टी दाखविणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणी बचत करणे हाच एकमेव उपाय नांदेडकरांसमोर आहे.