हदगाव : बोरगाव येथील काका-पुतण्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री १२:३० वाजता घडलेल्या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आज दुपारी दोघांचे मृतदेह निवघा बा.येथील एमएसईबीच्या कार्यालयात ठेवले. संबंधिताविरोधात गुन्हा नोंद झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. साईनाथ आनंदराव बुट्टेवाड( १८) व पांडुरंग बुद्धाजी बुटेवाड(२२) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.२०) रोजी गावात दोन लग्न होती. यापैकी एका लग्नाचा मंडप रात्री टाकला होता. हनुमान मंदीर व ग्रामपंचायत समोरील मोकळ्या जागेत हा विवाह सुरू होता. याच ठिकाणी विजेचे एक रोहीत्र आहे. या रोहीत्राची जागा बदलावी म्हणून अनेकदा ग्रामपंचायतीच्या वतीने एमएसईबीच्या कार्यालयात तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु या तक्रारीची कोणीही नोंद घेतली नाही.
रात्री अचानक हवा सुटल्याने हा मंडप उडू लागला, मंडपाच्या खांबाला धरुन बसविताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने साईनाथ आणि पांडुरंग यांना जोराचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघांना तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले.
आज (दि २०) रोजी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह निवघा बा. येथील एमएसईबीच्या कार्यालयात आणून ठेवले व संबंधितावर गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला. रविवार असल्याने कार्यालयात एकच ऑपरेटर हजर आहे. वरिष्ठांना फोनवरुन माहिती दिली, परंतू अद्यापही वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले नाहीत.