लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्याला वळसा घालून वाहणा-या पैनगंगा नदीवर साकूर व दिगडी कु. (हिंगणी) येथे उच्चपातळीवर बंधा-यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील २८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ब-याच शेतक-यांनी रबी व उन्हाळी पिके घेतल्याने उन्हाळ्यात हा परिसर हिरवागार असल्याचे चित्र पहावयास मिळाले.या दोन बंधाºयात १९ दलघमी पाणी साठण्याची क्षमता असून २८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे, असे असताना मोहपूर, साकूर, कुपटी, दिगडी (कु), दिगडी (धा.), मादापूर, शिवूर, हिंगणी या गावांच्या नदीकाठच्या शेतक-यांनी रबी व उन्हाळी हंगाम घेतला. ब-यापैकी सिंचन झाल्याने एरवी उजाड रान दिसणारे हे क्षेत्र या बंधाºयामुळे भर उन्हाळ्यात हिरवेगार पहावयास मिळाले. एरवी पैनगंगा नदी कोरडीठाक पडून या भागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असे. भूगर्भही पार खोल जाऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असे. या बंधा-याच्या निर्मितीमुळे पाणीसाठा होऊन कोरडे भूगर्भ व घटणारी पाणीपातळी आता जोमाने वाढली आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट तूर्तास तरी टळले आहे.पैनगंगा नदी बारमाही जिवंत कशी राहील यासाठी आ. प्रदीप नाईक यांनी प्रयत्न चालविले आहेत. पैनगंगा नदीचे पाणी जागोजागी अडावे यासाठी अनेक बंधारे निर्माण करण्याचा त्यांचा मानसही आहे. साकूर व दिगडी कु. (हिंगणी) येथे दोनशे कोटींच्यावर निधी खर्च करुन बंधारे बांधण्यात आले आहेत.विदर्भ, मराठवाड्यातील ९५ गावांवर नांगर फिरवून विस्थापित करणा-या प्रस्तावित निम्न पैनगंगा प्रकल्प (चिमटा धरण) बांधण्याचा आग्रह न धरता विष्णूपुरी (शंकर जलाशय) च्या धर्तीवर चिमटा धरण बांधणे गरजेचे आहे, अशी भूमिका बुडीत क्षेत्रात येणा-या गावकºयांची आहे. चिमटा प्रकल्प उभारणीला १५ वर्षाचा कार्यकाळ लागणार असून ते भरण्यास तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. या धरणाचा लाभ विदर्भ, मराठवाड्याला न होता तेलंगणाला होणार आहे. विष्णूपुरीच्या धर्तीवर बंधारा निर्माण झाल्यास बॅकवॉटरचा फायदा माहूर तालुक्यासह माहूर शहरालाही होणार असल्याने त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा माहूर तालुक्यातील सिंचनाच्या प्रतीक्षेत असणा-या शेतक-यांनी केली आहे.माहूरचा कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रुई येथे पैनगंगा नदीवर बंधारा बांधणे गरजेचे आहे. या बंधा-यामुळे रुई परिसरात सिंचन क्षेत्र वाढविण्यास मदत होईल, अशी रास्त अपेक्षा माहूरवासियांची आहे.---किनवट-माहूर तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदी बारमाही वाहती रहावी, त्यातूनच नदीकाठच्या गावचे सिंचनक्षेत्र वाढावे, शेतक-यांचा कृषी विकास व्हावा व टंचाईग्रस्त गावे टंचाई मुक्त व्हावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून मंजुरी मिळवून उच्चपातळी बंधा-याची निर्मिती केली.बंधा-यामुळे लवकरच शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही- प्रदीप नाईक, आमदार---साकूर येथे उच्चपातळी बंधाºयाची निर्मिती केल्याने साकूर व दिगडी (धा) परिसरातील शेतक-यांना मोठा फायदा झाला. दरवर्षी पैनगंगा नदी ही २५ डिसेंबरपर्यंत कोरडीठाक पडायची. परंतु साकूर येथे उच्चपातळी बंधारा बांधल्याने उन्हाळी पिके घेण्यासाठी मे अखेरपर्यंत पाणी या बंधा-यामुळे शेतक-यांना उपलब्ध झाले. यामुळे केळी, हळद पिकांना फायदा झाला- डॉ. सुनील दुबे, दिगडी(धा)---दिगडी कु. हिंगणी येथील बंधा-यामुळे परिसरात सिंचनाची सोय चांगली झाली आहे. यामुळे शेतीच्या माध्यमातून शेतक-यांचा सर्वांगीण विकास साधण्यास बांधलेला बंधारा उपयोगी ठरला-पांडुरंग टेकाळे, हिंगणी
उच्च पातळी बंधाऱ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील२८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:57 AM