नांदेड : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे.
देशातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने २५ सप्टेंबरला २०१७ रोजी ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजना सुरू केली. योजनेतंर्गत केवळ शहरच नव्हे, तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागात राहणाºया शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी द्यावयाची आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य' योजनेच्या माध्यमातून वीज न पोहोचलेल्या कुटुंबांना त्यांचे विजेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व वीजजोडण्या जुलैअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने कामे गतीने केली जात आहेत. दरम्यान, ७ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात वीजजोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे.
यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ५१ हजार २० कुटुंबियांना सदर योजनेअंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार ओह. आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी २ हजार ३५३ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्यातील ९ हजार ३२५ कुटुंबांपैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आली आहे. सदर योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत वीजजोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना अवघ्या पाचशे रूपयांमध्ये वीजजोडणी मिळणार असून हे शुल्कही नियमित वीजबिलासोबत दहा समान हप्त्यांत भरावयाचे आहे.
रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार सौभाग्य योजनेअंतर्गत परिमंडळातील प्रत्येक गरिबाच्या घरात वीजजोडणी दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. गोरगरिबांच्या चेहºयांवर हास्य फुलवू शकणारी ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी गरजूंनी आपल्या नजीकच्या महावितरण कार्यालयात जावून संपर्क करावा, असे आवाहन महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता संतोष वहाणे यांनी केले आहे.विशेष मोहिमेंतर्गत नांदेड परिमंडळात आतापर्यंत वीज जोडणीपासून वंचित असलेल्या ८५ हजार ७७७ कुटुंबांपैकी १० हजार ६०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.