अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : निवडून आल्यानंतर महापालिकेच्या नगरसेवकांची स्वेच्छा निधीतील कामे पहिल्यांदाच काढण्यात येत असून जवळपास ३८ नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतील कामांच्या निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.यापूर्वीच्या सभागृहातील सदस्यांना दोन वर्षे स्वेच्छानिधीची कामे करता आली नव्हती. आर्थिक परिस्थितीमुळे स्वेच्छा निधीची कामे प्रशासनाने काढली नव्हती. कामे काढली असली तरी त्याला ठेकेदाराने प्रतिसाद दिला नव्हता. परिणामी मागील सभागृहातील नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीचे मंजूर असलेले जवळपास १५ ते १६ कामे आयुक्त लहुराज माळी यांनी रद्द केले आहेत.जवळपास दीड कोटी रुपयांची कामे रद्द करण्यात आली आहेत.त्याचवेळी विद्यमान सभागृहातील ३२ नगरसेवकांची स्वेच्छा निधीतील कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे उर्वरित नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतील कामाचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले असून या कामाची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे.मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वेच्छा निधीतील कामे होऊ शकली नव्हती. स्वेच्छा निधीतून कामे करावीत याबाबत नगरसेवकांचा मोठा आग्रह होता. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांना २५ लाख रुपये स्वेच्छानिधी देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी ही मागणी मान्य करताना दहा लाखांचा स्वेच्छानिधी मान्य केला होता. यानंतर नगरसेवकांकडून स्वेच्छानिधीचे प्रस्ताव मागविण्यात आले. या प्रस्तावांना आता मूर्त स्वरुप येत असून निविदा प्रक्रियेपर्यंत कामे पोहोचली आहेत. त्याचवेळी जुन्या सभागृहातील नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना सुरुवातच झाली नसल्याने ती कामे रद्दच करण्यात आली आहेत. जवळपास दीड कोटी रुपयांची ही कामे आहेत. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे ठेकेदारांनी या कामांना कार्यारंभ आदेशानंतरही सुरुवात केली नव्हती. परिणामी कामाच्या आढाव्यात कामे रद्द करण्यात आली आहेत.त्यामुळे जुन्या सभागृहातील सुचविलेल्या नगरसेवकांची उरली-सुरली आशाही मावळली आहे. त्याचवेळी विद्यमान सभागृहातील नगरसेवकांचे स्वेच्छा निधीचे प्रस्ताव निविदा प्रक्रियेत पोहोचले असले तरी ठेकेदार या कामांना कितपत प्रतिसाद देतात यावर या कामाचे भवितव्य अवलंबून आहे.तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे, गणेश देशमुख यांनी स्वेच्छानिधीच्या कामाबाबत उदासीनताच दाखविली होती. त्याला आर्थिक परिस्थितीसह कामांचा दर्जाही कारणीभूत होता. विद्यमान आयुक्त माळी हेही प्रत्येक काम स्वत: अथवा नियुक्त केलेल्या पथकामार्फत पाहणी करुनच अंतिम करत आहेत.त्यामुळे माळी हेही टीकेचे धनी ठरत आहेत. त्यामुळे आगामी काळात या विषयातील घडामोडी औत्सुकतेचे ठरणार आहेत.दलित वस्तीच्या कामांना मुदतवाढ नाहीचशहरात दलितवस्तीच्या कामांना फेब्रुवारी २०१८ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. निधी असतानाही ठेकेदारांनी कामे सुरु केली नाहीत. कामे सुरु न करणाऱ्यांना ठेकेदारांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसानंतर ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली असून वाळूची उपलब्धता नसल्याने कामे रखडली असल्याचे कारण देत या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मात्र आयुक्तांनी सदर कामांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही कामे आता वेळेत पूर्ण होतील काय, हे पहावे लागणार आहे.
नांदेड मनपाकडून स्वेच्छानिधी निविदा प्रक्रियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:35 AM