केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर होते. नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून संबोधित केले. यावेळी अमित शाह यांनी जाहीर सभा घेत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणतात की, भाजपाने आपलं सरकार पाडलं. पण ते तसं नाहीय. खरा दगा तर उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला, अशी टीका अमित शाह यांनी केली. भाजपाचा अध्यक्ष असताना मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी गेलो होते. यावेळी बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं. पण जेव्हा निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा त्यांनी दिलेलं वचन तोडलं, असा आरोप पुन्हा एकदा अमित शाह यांनी केला.
सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे गेले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजू घेतली, असा निशाणा अमित शाह यांनी साधला. तसेच ३७० हटवलं हे योग्य केलं की नाही?, राम मंदिराची उभारणी योग्य आहे की नाही?, मुस्लिम आरक्षण संविधानिक नाही. मुस्लिम आरक्षण पाहिजे की नाही?, ते द्यायला हवं की नाही?, या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर द्यावी, असं आव्हान देखील अमित शाह यांनी यावेळी दिलं. तसेच उद्धव ठाकरेंनी समान नागरी संहितेबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची इच्छा आहे, असंही अमित शाह यावेळी म्हणाले.
कोणती शिवसेना खरी हेही स्पष्ट झालंय- अमित शाह
भाजपाने प्रत्येक क्षेत्रात विकास केला आहे. आज मी खास महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्रात अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. 'धनुष्यबाण' देखील शिवसेनेला परत मिळाला आहे. त्यामुळे कोणती शिवसेना खरी आहे? हेही स्पष्ट झालं, असं अमित शाह यावेळी म्हणाले.