- मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड):नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरातील येईलवाड कुटुंबाने गेल्या चार वर्षांपासून सामाजिक बदलाच्या दिशेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून आपल्या तिन्ही सुनांना देवीसमान मानून त्यांचेच गौरी पूजन केले आहे. येईलवाड कुटुंबाच्या या क्रांतिकारी पावलाची चर्चा होत आहे. या छोट्या परंतु अनोख्या बदलाने सूनांना एक उच्च दर्जा मिळून समाजात सासू-सुनेच्या नात्याचे वेगळे सकारात्मक रूप पाहण्यास मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सासू-सुनेचे नाते अनेकदा ताणतणावाचे, संघर्षाचे असल्याचे ऐकायला येते. पूर्वीच्या काळात सासूने सुनेला दिलेला त्रास आणि त्यानंतर सुनेने घेतलेला बदला यांबद्दल खूप काही वाचायला मिळते. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ( शरद पवार) ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांच्या कुटुंबाने या नकारात्मकतेला बाजूला ठेवून आपल्या सुनांना आदराने व सन्मानाने वागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या घरच्या तिन्ही सुनांची गौरी म्हणून पूजा केली आहे.
या प्रसंगी सुखदेव येईलवाड (आजोबा), पदवीणबाई येईलवाड (आजी), कमलबाई येईलवाड (सासू), रामचंद्र येईलवाड (सासरे), शिवनंदा येईलवाड व संगीता येईलवाड (भावजय), तसेच सूनांच्या माहेरचा परिवार व येईलवाड परिवार एकत्र आला होता. सून आदर, सन्मानास पात्र आहेत. समाजातील इतर कुटुंबांनीही अशा प्रकारच्या सकारात्मक बदलांचा स्वीकार करून आपल्या घरातील महिलांना आदर द्यावा, असे आवाहन येईलवाड कुटुंबाने केले आहे.
प्रत्येक कुटुंबाने बदल करावासासरे रामचंद्र येईलवाड यांनी यावेळी सांगितले, "आम्ही आमच्या सुनांना आदर आणि सन्मानाने वागवतो. आम्हाला आशा आहे की आमचे पाऊल इतरांना प्रेरित करेल." तसेच सामाजिक बदलासाठी शाहू-फुले-आंबेडकर या महापुरूषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन येईलवाड यांनी केले.
कुटुंबातील प्रेमाचे बंध घट्ट होतात कमलबाई येईलवाड, सुनेच्या सासू, यांनी या अनोख्या परंपरेबद्दल सांगितले, "आईसारखी माया आणि प्रेम दिले तर सूनही मुलगी होऊ शकते. आमच्या कुटुंबात या प्रेमळ नात्याचा प्रत्यय गेली चार वर्षे अनुभवत आहोत. गौरी पूजन सोहळ्याच्यानिमित्ताने सासू आणि सुनांमधील प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, हाच उद्देश आहे."