युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:48 AM2019-04-15T00:48:52+5:302019-04-15T00:50:29+5:30

उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती.

unjustice with nanded in water dispute | युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

googlenewsNext
ठळक मुद्देछगन भुजबळ गोदावरीचे पाणी भाजपा सरकारनेच गुजरातला वळविले

नांदेड : उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र हे पाणी वरच्या भागात नेवून नांदेडकरांवर भाजपा सरकारने अन्याय केल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. गोदावरीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस धादांत खोटे बोलत असून गुजरातचा पुळका असल्याने त्यांनीच हे पाणी तिकडे वळविल्याचा आरोपही त्यांनी केला.
खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, किशोर गजभिये यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर चौफेर हल्ला चढविला. २०१० मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने हे पाणी गुजरातला देण्याबाबत कसलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये येवून गोदावरीच्या पाण्याबाबत धादांत खोटे विधान केले. गुजरातचा पुळका कोणाला आहे हे सर्वसामान्यांना कळते. उलट भाजप सरकारच नांदेडकरांचे पाणी पळवून या जिल्ह्याची कोंडी करु पाहत आहे. भाजपाचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, याची खबरदारी मतदारांनीही घ्यायला हवी, असे सांगत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असा शब्द भुजबळ यांनी दिला.
मनसेच्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनवेगिरी नांदेडमध्ये पुराव्यासह उघड केली. त्यावर काहीही संबंध नसताना अशोकराव चव्हाण यांनीच राज ठाकरे यांना किरायाने सभेसाठी आणल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज ठाकरे यांना काँग्रेसने किरायाने आणले म्हणता मग चार-पाच पक्ष बदललेल्या आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या चिखलीकरांना भाजपाने कोणत्या भाडेतत्त्वावर उमेदवारी दिली? हेही मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, अशी बोचरी टीकाही भुजबळ यांनी केली.
देशातला मतदार हा चौकीदार नव्हे,तर तो या देशाचा मालक आहे. विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोकसीसारखे व्यापारी सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळवून गेले तेव्हा स्वत:ला चौकीदार म्हणणारे देशाचे पंतप्रधान झोपले होते का? अशी टीका करीत महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आणि सर्वसामान्य शेतकरी चारा छावण्याची मागणी करीत असताना हे सेना-भाजप सरकार डान्सबार आणि लावण्या देत असल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात बदल करण्याचे मनसुबे भाजपा सरकारचे असून ते उधळून लावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. प्रारंभी मारोतराव पवळे यांनी प्रास्ताविक तर दिगंबर गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
दारुवाला हवा की पाणीवाला ?
कै. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासूनच नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी नांदेडसाठी खेचून आणला. त्यामुळेच नांदेडचा चेहरामोहरा बदलला. विकासाची ही प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी अशोकरावांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मतदार दारुवाल्याच्या नव्हे, तर पाणीवाल्याच्या पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम- चव्हाण
मागील पाच वर्षांत सर्वच आघाड्यांवर शिवसेना-भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. या नाकर्त्या सरकारला सत्तेबाहेर खेचण्याचा विडा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उचलला आहे. ही आघाडी भक्कमपणे काम करीत असल्याचे खा.अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गोरठा येथे झालेल्या संयुक्त सभेपासून बापूसाहेब गोरठेकर तसेच गंगाधरराव कुंटूरकर आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने काँग्रेस प्रचारार्थ झटत आहेत. मात्र युतीचा उमेदवार कुंटूर व गोरठ्याच्या वाड्यावर जावून आल्याचे सोशल मीडियावर फोटो टाकून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जनता चाणाक्ष आहे. विरोधकांच्या अशा खेळींना ते बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. युपीपी व बाभळीच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनीच एकत्रित येण्याची गरज आहे. उमरी भागातील शेतकऱ्यांनी युपीपीच्या पाण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन करीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सक्षम आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

Web Title: unjustice with nanded in water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.