नांदेड: विनापरवाना बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करू पाहणाऱ्या कर्नाटकातील बियाणे कंपनीच्या एजंटास नांदेडमध्ये कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून ५२ हजारांचे कापूस बियाणे जप्त केले असून, कर्नाटकातील केमीसाईड क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधीसह दोन संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना बियाणे विक्री चालू असल्याची गुप्त माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून हे कापूस बियाणे पकडून जप्त करण्यात आले. या कंपनीचे कापसाचे ६० पाकीट (५१ हजार ८४० रुपये) जप्त करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सचिन कपाळे यांच्या तक्रारीवरून कंपनीचा प्रतिनिधी मिथुन देमा चव्हाण (रा. सांगवी तांडा, जि.हिंगोली) तसेच मे. केमिसाईड्स क्रप प्रोटेक्शन बेल्लारी (रा. कर्नाटक) या कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात कृषी विकास अधिकारी विजय बेतीवार, तंत्र अधिकारी प्रवीण भोर, जिल्हा गुणनियंत्रक गिरी, कृषी अधिकारी छाया देशमुख, गजानन हुंडेकर, आदी उपस्थित होते.
सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून, बी-बियाणांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात येत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही कंपन्या व एजंट परराज्यातील बियाणे विक्रीस बंदी असताना जिल्ह्यात आणून विक्री करीत आहेत. गुणवत्ताहीन बियाण्यांची शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास त्याची उगवण क्षमता किंवा फळधारणा व्यवस्थित होत नसल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे नापिकी आणि उत्पन्नात घट यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल शेतकऱ्यांना उचलण्याची वेळ येते.
महाराष्ट्रात विक्री परवाना नसताना बियाणे विक्रीया कंपनीकडे महाराष्ट्रात बियाणे विक्री परवाना नसताना बेकायदेशीर कापसाच्या बॅगची विक्री करण्यात आली. जप्त केलेल्या प्रत्येकी वाणाचे प्रति पाच पाकीट असे १० पाकीटचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. उर्वरित जप्त केलेले ५० पाकीट शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.