नांदेड : भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिसांचाराचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ बंदमुळे वाहतुक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते़ बहुतांश शाळांना सकाळी सुट्टी दिल्याने परिसरात शुकशुकाट होता़ दरम्यान, काही भागात या बंदला हिंसक वळण लागले.
बंदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासूनच बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता़ व्यापार्यांनीही स्वताहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती़ नांदेड शहरातील विविध भागासह सिडको-हडको परिसरातही कार्यकर्त्यांनी रॅली काढून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले़ त्यामुळे बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले़ बंद दरम्यान रुग्णालये तसेच औषधांची दुकाने सोडली तरी, इतर ठिकाणचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ भावसार चौकातील आठवडी बाजारातही बंदमुळे तुरळक गर्दी होती़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास आयटीआय चौक येथून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. बंद मागे घेतल्यानंतर शहरातील व्यवहारही सुरळीत झाले.
एसटीच्या ७०० फेर्या रद्दभिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते़ त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी ८३७ पैकी तब्बल ७०० फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे महामंडळाचे जवळपास ३५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. भीमा कोरेगाव येथील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनेनंतर मंगळवारी जिल्ह्यात आंदोलनकर्त्यांनी दहा बसेसवर दगडफेक केली होती़ त्यामुळे महामंडळाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते़ त्यानंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती़ खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड विभागातून सकाळच्या वेळी काही बसेस सोडण्यात आल्या़ परंतु दुपारी अकरानंतर एकही बस नांदेड आगारातून बाहेर पडली नाही़
दिवसभर एसटीच्या केवळ ५५ फेर्या करण्यात आल्या़ तर ७८२ फेर्या रद्द करण्यात आल्या़ कंधार, उमरी आणि अर्धापूर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफे केली़ त्यामुळे बसेसच्या काचा फुटल्या होत्या़ बसफेर्या रद्द झाल्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानकावरुन आल्या पावली परतले़ दुपारनंतर नांदेड बसस्थानकात शुकशुकाट होता़ सायंकाळी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर काही आगारातून बसेस सोडण्यात आल्या़ परंतु दिवसभरात महामंडळाचे जवळपास ३५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले़ दरम्यान, वाहतूक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.