- विशाल सोनटक्के
नांदेड : आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला होता. या पावसामुळे शेती पिकांसह बहुवार्षिक पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यापोटी आता मराठवाड्याला २४९ कोटी ३६ लाखांची मदत देण्यात येणार असून यामध्ये सर्वाधिक ७१ कोटी ८८ लाख रुपये बीड जिल्ह्याला मिळणार आहेत.
आॅक्टोबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून राज्याला अवेळी पावसाने झोडपले होते. राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांमधील शेती पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. विशेषत: नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. हातातोंडाशी आलेले उभे पीक अवकाळी पावसामुळे नेस्तनाबूत झाल्यानंतर राज्य शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले होते. ही मदत आपद्ग्रस्तांना मिळाली. यासाठी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडून या संदर्भात उपयोगीता प्रमाणपत्रे सादर करुन बाधित शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही करण्यात आली होती.
या अनुषंगाने राज्य शासनाने शेती पिकासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर बहुवार्षिक (फळबागा) पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्याच्या महसूल विभागाने आता नुकसानभरपाई देण्याचे निश्चित केले असून यासाठी २४९ कोटी ३६ लाख १५ हजार रुपये मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा२०१९ मध्ये अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचे मोठे नुकसान केले होते. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोसावा लागला होता. राज्य शासनाने या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील तब्बल २४९ कोटी ३६ लाख रुपये हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५० कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये, लातूर २४ कोटी ४९ लाख, बीड- ७१ कोटी ८८ लाख, जालना ३१ कोटी ९७ लाख, परभणी ३९ कोटी ५९ लाख, हिंगोली २० कोटी ७५ लाख, लातूर २४ कोटी ४९ लाख, उस्मानाबाद ७ कोटी ७१ लाख तर औरंगाबाद जिल्ह्याला २ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी थेट जमा होणार २०१९ मधील नुकसानभरपाईपोटी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २४९ कोटी ३६ लाखांची मदत मिळणार आहे. संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात हा निधी थेट जमा करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्टा स्वरूपात मदतीचे वाटप करु नये. तसेच मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेशही दिले आहेत. - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.................