आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:34 AM2019-04-04T00:34:36+5:302019-04-04T00:36:52+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

The UPA alliance unit will change govt | आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

googlenewsNext
ठळक मुद्देगोरठा येथे मोठा प्रतिसाद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त सभेत व्यक्त केला विश्वास

नांदेड : काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशात सत्तापरिवर्तन करण्यासाठी आघाडीतील सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्धार बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
उमरी तालुक्यातील गोरठा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीसह रिपाइं (गवई गट), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी मित्रपक्षांची संयुक्त सभा काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पार पडली. या सभेला खा. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, हरिहरराव भोसीकर, अप्पाराव सोमठाणकर, राजेश कुंटूरकर, संजय लहानकर, शिरीष देशमुख गोरठेकर, संगीता जाधव, डॉ. सुनील कदम, जगन शेळके, सदाशिव पोपुलवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, कै. शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम, बाबासाहेब गोरठेकर, बन्नाळीकर यांनी नांदेड जिल्ह्यात समन्वयाने राजकारण केल्याचा इतिहास आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे वैचारिक मित्र आहेत. देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही मजबूत आघाडी देशात निश्चितपणे सत्तापरिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावपातळीवरील कार्यकर्ते आमचे काय? असा प्रश्न करीत आहेत. या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुकांत आघाडीतील पक्षांनी एकजुटीने कामाला लागायला हवे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या. काँग्रेसला स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्तेत येता आले असते. परंतु माझी नेहमीप्रमाणेच सामंजस्याची भूमिका होती. त्यामुळेच काँग्रेस ३ व राष्ट्रवादी ३ अशी पदांची विभागणी केल्याचे सांगत, काही ठिकाणी वैचारिक मतभेद होऊ शकतात. परंतु माझे कोणाशीही वैयक्तिक मतभेद नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीमध्ये विसंवाद नव्हे तर सुसंवाद असला पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचे सांगत पाणीप्रश्न जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पाणी नंतर मिळणार नाही. त्यामुळे पाण्याचा हा लढा आपण आत्ताच लढला पाहिजे अन्यथा उमरी, धर्माबाद तालुक्याचे वाळवंट होईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला. कमलबाबूंना एमएलसी करण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेवून निवडून आणले. ही माणसे व कार्यकर्ते आज सांभाळायला हवीत, असे उद्गारही त्यांनी काढले.
यावेळी बापूसाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर, कमलकिशोर कदम, शंकरअण्णा धोंडगे यांचीही भाषणे झाली. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये नुकताच काँग्रेसने भाजपाचा सफाया केला, त्याच निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करु, असा विश्वास कुंटूरकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार-गोरठेकर
काँग्रेस-राष्ट्रवादी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालले आहेत. राजकारणात आजवर मी कधी कुठला शब्द दिला नाही. परंतु आघाडी धर्म पाळण्याचा शब्द मी आमचे नेते शरद पवार यांना दिला आहे आणि तो मी पाळणारच असल्याचे सांगत आमच्या रक्तात गद्दारी नसल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी काढले. अशोकराव चव्हाण यांचा विजय निश्चित आहे. तुम्हाला निवडून आणणे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत प्रचारासाठी मी स्वत: फिरत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: The UPA alliance unit will change govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.