- भारत दाढेलनांदेड- जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत उतुंग यश मिळवित नांदेडच्या गुणत्तेत भर टाकली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर नांदेडच्या रजत नागोराव कुंडगीर याने ६००, बाभुळगाव येथील शिवहार चक्रधर मोरे याने ६४९ तर नांदेडच्या सुमीतकुमार दत्ताहरी धोेत्रे याने ६६० रँक मिळवित यश संपादन केले.
नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगीर यांचे सुपूत्र रजत कुंडगीर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाल्यानंतर त्याने पुण्यात बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण कला शाखेत पूर्ण केले. हे करीत असताना युपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यासातील सातत्य व ध्येय बाळगून रजतने दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले आहे. नांदेडच्या नवाममोंढा भागात राहणाऱ्या रजतची आई व भाऊ शुभम कुंडगीर हे लघु उद्योजक आहेत.
नांदेड तालुक्यातील बाभूळगाव या ठिकाणी राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील शिवहार चक्रधर मोरे याने ६४९ रँक घेवून आपले स्वप्न पूर्ण केले. वडील चक्रधर मोरे हे शेतकरी असून घरी पाच एकर जमीन आहे. तर शिवहार यास दोन भाऊ एक बहिण असून बहिण राखी मोरे हिने एमबीबीएस पूर्ण केले आहे. तर एक भाऊ इंजिनिअर आहे. शिवहार याचे दहावी पर्यंतचे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल तर बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात पार पडले. त्यानंतर पुणे येथे इंजिनिअरींग पूर्ण करुन तो दिल्ली येथे युपीएससीच्या तयारीसाठी गेला. या ठिकाणी त्याने दिवसरात्र अभ्यास करुन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
नांदेड येथील पत्रकार दत्ता हरी धोत्रे यांचे सुपुत्र इंजिनिअर सुमित् धोत्रे याने युपीएससी ६६० रँक घेवून यश मिळविले. सुमीत यांचे वडील मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतात. तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. सुमित धोत्रे यांचे शिक्षण आयआयटी खडकपूर येथून पूर्ण झाले. त्यानंतर युपीएससीची तयारी करण्यासाठी त्याने आंबेडकरवादी मिशन दिल्ली येथे दिपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला. मानववंश शास्त्र हा विषय घेवून सुमितने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.