नांदेड : नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयात आजघडीला केवळ २० दलघमी इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. उपयुक्त जलसाठा २५ टक्के असून, मृग नक्षत्राचा पाऊस पडण्यासाठी किमान एक महिना असल्याने नांदेडकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोवर मानार प्रकल्पात सद्य:स्थितीला ३४.७७ दलघमी म्हणजे २५.१६ टक्के पाणी आहे, तर विष्णुपुरी प्रकल्पात सद्य:स्थितीला २०.३५ दलघमी पाणीसाठा आहे. याशिवाय इसापूर प्रकल्पात ३६.३७ टक्के, येलदरी धरणात २९.२९ टक्के याप्रमाणे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मोठ्या प्रकल्पात सरासरी ३१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
याशिवाय जिल्ह्यातील मध्यम असलेल्या कुंद्राळा डॅममध्ये २४.७६ टक्के, करडखेड डॅम ६५ टक्के, कुडाळा डॅम ५५ टक्के, पेठवडज डॅममध्ये २१.६३ टक्के, महालिंगी कोरडेठाक पडले आहे, तर अपर मानार डॅम ३.७१ टक्के, नागझरी डॅम ३५.१९ टक्के, लोणी डॅम २९.५२ टक्के, तर डोंगरगाव डॅममध्ये २८.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. वाढत्या तापमानाने धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काही भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
लहान प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठाजिल्ह्यातील लहान प्रकल्पांत उपलब्ध असलेला पाणीसाठा असा- अमदुरा २५ टक्के, अंतेश्वर कोरडेठाक, बाभळी १२ टक्के, तर बळेगाव प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
शहरात पाण्याचा होतोय गैरवापरशहरात सध्या मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने बेमालूमपणे उपलब्ध पाण्याचा वापर केला जात आहे, तसेच नळाचे पाणी काही भागांत अनेक तास राहत असल्याने गाड्या धुण्यासाठी पाण्याची नासाडी केली जाते. यावर मनपाने अंकुश घालणे गरजेचे आहे.