Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 04:27 PM2021-10-06T16:27:24+5:302021-10-06T16:35:20+5:30
Deglur by-election: मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. उत्तम इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
नांदेड/मुंबई : देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीत ( Deglur by-Election ) वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahujan Aaghadi ) उमेदवार उतरवला आहे. देगलूर येथीलच डॉ. उत्तम रामराव इंगोले यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आज मुंबई येथील केंद्रीय कार्यालयातील पत्रकार परिषदेत केली. (VBA gave ticket to Dr. Uttam Ingole for Deglur by-election )
कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३० ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने नुकतीच रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपाने मोठी खेळी केली करत शिवसेनेचे माजी आमदार आणि गेल्या वेळचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. उत्तम इंगोले गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार व प्रसार कार्यात सक्रीय होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी देगलूर मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली होती.
कोण आहेत डॉ. उत्तम इंगोले ?
डॉ. उत्तम रामराव इंगोले यांचे शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ) असे झाले असून गेल्या १८ वर्षापासून देगलूर मध्ये डॉ. इंगोले हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधीलकीतून नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. फुले शाहू आंबेडकर विचार मंच व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून त्यांचे सातत्याने सामाजिक कार्य सुरु आहे. मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत. विशेषत: ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून महत्वपूर्ण काम केले आहे. ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवा जागृत करताना रक्तदान सारख्या अति महत्त्वाच्या विषयावर ही त्यांनी ग्रामीण भागात कार्य केले आहे.