- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ): ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शुक्रवारी सायंकाळी नदीला अचानक पूर आला. या पुरात एक शेतकरी वाहून गेला असल्याची घटना रोडगी येथे उघडकीस आली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाने तात्काळ शोध कार्य सुरू केले. शेतकऱ्याचा आज सव्वा चार वाजता मृतदेह आढळून आला. जनार्धन किशनराव सितापराव ( ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी दुपार नंतर अर्धापूर तालुक्यातील रोडगी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नाल्याला पूर आला. तर मुख्य रस्त्याचा भराव वाहून रस्त्यावर भगदाड पडले. याचवेळी सायंकाळी शेतात जात असताना पुरात जनार्धन किशनराव सितापराव ( ४०) हे वाहून गेले. माहिती मिळताच शेतकऱ्याच्या शोध घेण्यासाठी अर्धापूर पोलिस व महसुल प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. अंधारामुळे रात्री उशिरा शोध कार्य थांबले होते.
आज सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले. दुपारी सव्वा चार वाजता शेतकरी जनार्धन यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी तहसीलदार उज्वला पांगरकर, महसुल साहाय्यक गरूडकर,नायब तहसीलदार शिवाजी जोगदंड, मंडळ अधिकारी नवीन रेड्डी, तलाठी बालाजी माटे, लक्ष्मण देशमुख, पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सापोनी दिपक मस्के, वेदपाठक, आर. एस. नरवाडे, माजी सरपंच प्रल्हाद काकडे, सरपंच प्र.दगडु काकडे ग्रामस्थ आदींनी मदत कार्य केले.