नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अधिसभा आणि विद्या परिषद प्रतिनिधीसाठीची मतमोजणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ पहाटे तीननंतर विविध पदासाठीचे निकाल जाहीर करण्यात आले़
रविवारी विद्यापीठ परिक्षेत्रातील १८ केंद्रावर यासाठी मतदान पार पडले होते़ मतमोजणी मंगळवारी सकाळी १० वाजता प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झाली़ बुधवारी पहाटे सर्व निकाल जाहीर करण्यात आले़ संलग्नीत व स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यता प्राप्त परीसंस्थामधील अध्यापक गटामधून निवडून द्यावयाच्या दहा प्रतिनिधींसाठी ६२ प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. तर सर्वसाधारण गटाच्या पाच प्रतिनिधीसाठी २४ प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ.सुर्यकांत जोगदंड, डॉ.दीपक बच्चेवार, डॉ. अंबादास कदम, डॉ. डी.एन. मोरे आणि अशोक मोटे हे विजयी झाले आहेत. महिला गटाच्या एका जागेसाठी चार जण रिंगणात होते़ यामध्ये प्रा.डॉ.ए.एन.गित्ते या विजयी झाल्या आहेत.
अनुसूचित जाती गटाच्या एका जागेसाठी मोठी चुरस होती़ तब्बल अकरा जणांनी यासाठी निवडणूक लढविली़ मतमोजणी अखेर डॉ. पंचशील एकंबेकर हे विजयी झाले़ अनुसूचित जमाती गटाच्या एका जागेसाठी आठ प्रतिनिधी रिंगणात होते. यामध्ये डॉ.ए.पी.टिपरसे हे विजयी झाले आहेत. ओबीसी गटाच्या एका जागेसाठीही आठ जणांमध्ये चुरस रंगली होती़ यामध्ये डॉ. संजीव रेड्डी यांनी बाजी मारली़ आणि निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती किंवा भटक्या जमाती) गटाच्या एका जागेसाठी सात प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ. दीपक चाटे विजयी झाले आहेत.
विद्यापीठ परिसर अध्यापक गटामधून निवडून द्यावयाच्या तीन प्रतिनिधींसाठी नऊ प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये सर्वसाधारण गटाच्या एका जागेसाठी चार प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ.सिंकू कुमार सिंह हे विजयी झाले. एस.सी.गटाच्या एका जागेसाठी चार प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ. चंद्रकांत बाविस्कर हे विजयी झाले आहेत. आणि महिला गटाच्या एका जागेसाठी एकच महिला प्रतिनिधी निवडणूक रिंगणात असल्यामुळे डॉ. शैलजा वाडीकर यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
संलग्नीत व स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यता प्राप्त परीसंस्थामधील अध्यापक व विद्यापीठ परिसर अध्यापक गटामधून प्रत्येक विद्याशाखेनिहाय दोन प्रतिनिधी याप्रमाणे विद्यापरीषदेवर आठ अध्यापक प्रतिनिधी निवडून द्यावयाचे होते. विद्यापरीषदेच्या तीन जागांसाठी एकाही प्रतिनिधीने आपला उमेदवारी अर्ज सदर केला नाही. त्यामुळे पाच प्रतिनिधींसाठी तेरा प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्वसाधारण गटाच्या एका जागेसाठी तीन प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ.भालचंद्र करंडे हे विजयी झाले आहेत. एस.सी.गटाच्या एका जागेसाठी दोन प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ.एस.एस.बोडके हे विजयी झाले आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या सर्वसाधारण गटातून डॉ.रमाकांत घाडगे हे विजयी झाले आहेत. निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती किंवा भटक्या जमाती) गटासाठी एक जागा असून याकरिता एकाही प्रतिनिधीने आपला उमेदवारी अर्ज सदर केला नसल्यामुळे ही जागा रीक्त राहणार आहे.
ह्युमॅनिटीज विद्याशाखेच्या सर्वसाधारण गटातून डॉ.रेखा हिंगोले विजयी झाल्या़ ओबीसी गटासाठी एक जागा असून याकरिता एकाही प्रतिनिधीने आपला उमेदवारी अर्ज सदर केला नसल्यामुळे ही जागा रीक्त राहणार आहे. इंटर डिसीप्लीनरी स्टडीज विद्याशाख्येच्या सर्वसाधारण गटासाठी एका जागेसाठी दोन प्रतिनिधी निवडणूक रिंगणात होते. यामध्ये डॉ.वैजयंता पाटील ह्या विजयी झाल्या आहेत. एस.टी. गटासाठी एक जागा असून याकरिता एकाही प्रतिनिधीने आपला उमेदवारी अर्ज सदर केला नसल्यामुळे ही जागा रीक्त राहणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र शिंदे आणि कुलसचिव डॉ.रमजान मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
उमेदवाराअभावी तीन जागा रिक्तवाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती किंवा भटक्या जमाती) गटासाठी एक जागा होती़ मात्र यासाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ही जागा रीक्त राहणार आहे. तसेच ह्युमॅनिटीज विद्याशाखेच्या ओबीसी गटासाठी एक जागा होती़ मात्र यासाठीही उमेदवारी अर्ज आला नाही़ त्यामुळे ही जागाही रिक्त राहिली आहे़ इंटर डिसीप्लीनरी स्टडीज विद्याशाख्येच्या एस.टी. गटाची जागाही याच कारणामुळे रिक्त राहिली आहे़