नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करत मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. नांदेडमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. नांदेड तालुक्यातील निळा येथे शेकडो महिलांसह समाज बांधवांनी राजकीय नेत्यांना गाव बंदी बरोबरच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे यासह सगळे सोयरे आणि इतर मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यानंतरही सरकारकडून कुठलाही कृती कार्यक्रम अथवा अध्यादेश काढला जात नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको, राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. रास्ता रोको करण्यासाठी नागरिकांकडून रस्त्यावर मंडप टाकून खिचडी, भोजनाची ही व्यवस्था केली जात आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढाई सुरू राहील अशी भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे.