तो शिक्षक निलंबित
नायगाव - शाळेतील विद्यार्थिनींना अश्लील एसएमएस पाठविणाऱ्या शिक्षकाला संस्थेने निलंबित केल्याची माहिती मुख्याध्यापिका गोदावरी विभुते यांनी दिली. बापुराव मोरे असे शिक्षकाचे नाव असून, मंगळवारी त्याला कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
सचिवपदी येपुरवाड
कुंडलवाडी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी लक्ष्मीकांत येपुरवाड यांची नियुक्ती झाली. यापूर्वीचे लक्ष्मण सोमशेट्टे सेवानिवृत्त झाले असल्याने हे पद रिक्त होते. दरम्यान एका कार्यक्रमात सोमशेट्टे यांना निरोप तर येपुरवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासक रमेश कांबळे, लक्ष्मण सोमशेट्टे, दिगंबर भालेराव आदी उपस्थित होते.
नवीन इमारतीची मागणी
हदगाव - बरडशेवाळा येथील ग्रामपंचायतीला नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला निवेदनही पाठविण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात बाळासाहेब ठाकरे संसद भवन इमारत किंवा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.
ठक्करवाड यांची भेट
कुंडलवाडी - येथील प्राथिमक आरोग्य केंद्रास जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. ३५ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड, नरेश बोधनकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिवस
बिलोली - तालुक्यातील आदमपूर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सहशिक्षक एन.एम. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी मुख्याध्यापक एच.एम. पटेल, सहशिक्षिका सुमती जाधव, गुरले, बी.एन. कलेटवाड, टी.एस. हाळदे, सी.आय. पिलगोडे, जी.एल. चालुस्कवार, एस.आर. मठदेवरू, एस.व्ही. स्वामी आदी उपस्थित होते.
लोणी येथे घरफोडी
देगलूर - तालुक्यातील लोणी येथे १ मार्च रोजी घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातील रोख ५२ हजार रुपये लंपास केले. नामदेव बाचीफळे यांच्या घरी ही चोरी झाली. मरखेल पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
उमरी - कै. दिगंबर येरावार यांच्या स्मरणार्थ आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक मारोतराव कवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार सुनील माचेवाड, संदीप पाटील, सरपंच प्रभाकरराव पुयड, गणेश पाटील ढोलउमरीकर, संतोष पाटील, गंगाधर पाटील, माणिक बैनवाड, किशनराव येरावाड, पप्पू माचेवाड आदी उपस्थित होते.
जि.प.ची आमसभा
नांदेड - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. नांदेड येथे होणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
हदगाव - मानवरहित लोकशाही पक्षाच्या वतीने सचिन साठे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजी मात्रे, संतोष पवार, जयराम वाघमारे, किशन कांबळे, मारोती मनपूर्वे उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंती
माळाकोळी - येथे विश्वकर्मा जयंती आणि संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला सरपंच वैष्णवी शूर, मोहन शूर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सचिन कनोजवार, शिवाजी पांचाळ, दत्ता पांचाळ, आत्माराम पांचाळ, धोंडीराम पांचाळ, शिवकुमार कनोजकर आदी उपस्थित होते.
सविता खडसे यांची नियुक्ती
नांदेड - सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या नांदेड समन्वयकपदी सविता खडसे यांच्या नियुक्तीचे पत्र अध्यक्षा स्नेहलता कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. यावेळी आकांक्षा पवार, नम्रता राठोड, पूजा जोंधळे, जयश्री अडकिणे, शिल्पा कल्याणकर, मधुरा कवटीकवार, प्रियंका पाटील, आरती नेम्मानीवार, राणी रत्नपारखे, निकिता देशमुख, विशाखा भद्रे, उषा उत्तरवार, अर्चना थोरात, स्वप्ना वानखेडे, राजश्री चव्हाण आदी उपस्थित होते.