विद्युत खांब गंजले
बिलोली - बिलोली तालुक्यातील विविध भागांतील विद्युत खांब गंजले आहेत. कित्येक वर्षांपूर्वी खांब बसवण्यात आले होते. मधल्या काळात महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कोणता खांब कधीही पडतील. या विद्युत खांबांवरील तारांतून सदैव वीज प्रवाह सुरू असतो. त्यामुळे एखादा खांब पडून लोकांशी संपर्क झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. म्हणून महावितरणने खांब बदलण्याची गरज आहे.
अवैध दारू विक्री
हदगाव - हदगाव तालुक्यातील मनाठा, बामणी फाटा परिसरातून अवैध पार्सल दारू विक्री सुरू आहे. शासनाने दारू विक्री बंदीचा आदेश देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येते. या भागातील काही बारमधून तसेच दुचाकीवरून छुप्या मार्गाने दारू विक्री केली जाते. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अनोळखी इसमाचा मृतदेह
कंधार - कंधार तालुक्यातील वंजारवाडी शिवारात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कंधार पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. माजी पोलीस पाटील रघुनाथ गिते यांनी तक्रार दिली होती.
नुकसानग्रस्तांना मदत द्या
बिलोली - जि.प. सदस्या मीनल खतगावकर यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. ६ मे रोजी बिलोली तालुक्यात खतगाव, केसराळी, आदमपूर, मुतन्याळ परिसरातील काही ठिकाणी घरे पडली. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. काही गावांत म्हशी, शेळ्या, कोंबड्या दगावल्या. पावसामुळे भुईमूग, तीळ, आंब्याचे नुकसान झाले असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.
विजेचा लपंडाव बंद करा
लोहा - शहरापासून जवळ असलेल्या पार्डी येथे गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरातून पाच ते सहा वेळा वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले. कधीकधी विजेचा दाबही अत्यंत कमी असतो. यासंदर्भात भाजपाने निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. कमीअधिक वीज पुरवठ्यामुळे घरातील ट्युबलाइट, पंखे, फ्रीज आदी उपकरणे बिघडत असून सुरळीत वीज पुरवठा करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गायकवाड, व्यंकट डिकळे, संदीप पवार, मोतीराम पवार, सुनील गायकवाड, मोतीराम गायकवाड आदींनी दिला आहे.
बाराहाळी परिसरात पाऊस
बाराहाळी - शुक्रवारी दुपारी २ च्या दरम्यान बाराहाळी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे टरबूज, खरबूज, आंबे, भुईमूग आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शेतकरी उन्हातान्हात काम करून बाजारात किंवा गल्लीबोळात फळे, भाजीपाला पुरवठा करीत होते. अवकाळी पावसाने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.
मुदखेडमध्ये इफ्तार पार्टी
मुदखेड - मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त नगरसेवक रावसाहेब चौदंते यांच्या वतीने मुस्लीम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धव पवार, नगरसेवक करीम खान, माजी उपनगराध्यक्ष खुर्शीद, सूर्यकांत चौदंते, रावसाहेब चौदंते, साहेबराव राहेरकर, नयूम आदी उपस्थित होते.
भोकरमध्ये विजेचा लपंडाव
भोकर - शहरातील बोरगाव रस्त्यावरील सोनटक्के कॉलनीत वीज खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. पाऊस व वादळवारा सुरू झाला की नागरिकांना हा त्रास होत आहे. कधी वीज जाईल याचा नेम नाही. पहाटे वीज पुरवठा खंडित झाला की पाण्याची समस्या निर्माण होते. रात्रीही वीज पुरवठा अनेकवेळा खंडित होतो. यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांचा आहे.
गळफास लावून आत्महत्या
देगलूर - तालुक्यातील नरंगल येथील २९ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ६ मे सकाळी उघडकीस आली. केशव कर्णे असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळाले नाही. देगलूर पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. जमादार सकनुरे तपास करीत आहेत.
भोकरमध्ये लसीकरण सुरू
भोकर - येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. ७ मे रोजी ७०० डोस उपलब्ध झाले. अधीक्षक डॉ. अशोक मुंडे, सत्यजीत टीप्रेसवार, संदीप ठाकूर, मनोज पांचाळ, कुलकर्णी, दुधमलवार आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. मागील १५ दिवसांपासून ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबले होते.
काळ्या फिती लावून निषेध
मुदखेड - सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांना लेखी निवेदन देऊन केंद्र व राज्य सरकारचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. आरक्षण रद्द होण्यास केंद्र व राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. निवेदनावर शत्रुघ्न पाटील, गोपीनाथ पाटील, पंजाबराव पाटील, नामदेव शिंदे, शिवाजी वडजे, गंगाधर मगरे, विश्वंभर पवार, सुभाष मगरे, मारोती दाढे, गोविंद शिंदे, गोविंद गाढे, गणेश खानसोळे, अमोल अडकिणे आदींच्या सह्या आहेत.