निवडणुकीची रणधुमाळी
सगरोळी - सगरोळी परिसरातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सगळीकडे वातावरणनिर्मिती झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक ठिकाणी स्वयंघोषित सरपंच कामाला लागले आहेत.
तामशात चोरी
हदगाव - तामसा-भोकर रोडवर असलेल्या आदी ट्रेडिंग या भुसार दुकानात चोरट्यांनी १२ डिसेंबर रोजी रात्री डल्ला मारला. चोरट्यांनी २५ ते ३० हजारांचा ऐवज लांबविला. व्यापारी मुक्रमखान पठाण हे दुकान बंद करून घरी गेले. चोरट्यांनी सीसीटीव्ही सिस्टिम, गल्ल्यातील रोख तीन ते साडेतीन हजार रुपये असा एकूण २५ ते ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. १२ रोजी ही घटना लक्षात येताच पठाण यांनी तामसा पोलिसात तक्रार दिली.
दानवेंचा पुतळा जाळला
अर्धापूर - शेतकऱ्यांविरूद्ध वक्तव्य केल्याच्या आरोपावरून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या आंदोलनात संचालक दत्ता पाटील पांगरीकर, प्रल्हाद इंगोले, संतोष कपाटे, संतोष कदम, सदाशिव इंगळे, नागेश सरोळे, अशोक डांगे, कैलास कल्याणकर, काझी सल्लाउद्दीन, विठ्ठल कल्याणकर, शेख रफीक, रमेश क्षीरसागर, सुदाम चौरे, सुनील बाेबडे, कपिल कदम उपस्थित होते.
संजीवन सोहळा उत्साहात
भोकर - तालुक्यातील हळदा येथे श्री संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७२४ वा समाधी संजीवन सोहळा १३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी माउलींच्या नावाचा जयघोष करून गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर महाआरती, प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमास गावातील सर्व भजनकरी व अन्य उपस्थित होते.
कापूस जळून खाक
भोकर - तालुक्यातील रिठा येथील शेतकरी सीताराम देशटवाड यांच्या शेतातील आखाड्यावरील राहत्या घरास आग लागून कापूस व इतर साहित्य जळून नुकसान झाले. यामध्ये ४० कोंबड्या, २५ क्विंटल कापूस, बोअरचे केबल, १० पाईप, गहू, ज्वारी जळून खाक झाले.
ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता
मुदखेड - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माउली समाधी सोहळा आणि संतकवी दासगणू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथराज पारायण सोहळ्याची सांगता नुकतीच झाली. पारायणाला मामीडवार यांच्या पत्नी गंगूबाई मामीडवार, विश्वनाथ जोशी आदींचा सहभाग होता. काल्याचा प्रसाद वाटप झाला. यावेळी मंदिराचे अध्यक्ष राजबहादूर कोत्तावार, देविदास कवळे, हरिश्चंद्र कवळे, शंकरराव आरेवार, देवानंद गुंजाळ, महावीर कंधारकर, विठ्ठलराव अडकिणे, नामदेव कहाळेकर आदी उपस्थित होते.
मानधनाची मागणी
धर्माबाद - शालेय पोषण आहार कामगारांना प्रत्येकी १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर नागोराव कमलाकर, शेख शरफोद्दीन, संभाजी लांडगे, मारूती मेतकुलवाड, वाय.बी.पवार, विठ्ठल डोनगिरे, श्यामराव हुमणे, साईनाथ दासलवाड आदी उपस्थित होते.