अर्धापूर ( नांदेड ) : अत्यंत रंजक झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे तर दुसरीकडे चक्क एका गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप असलेल्या फरार उमेदवाराने बाजी मारली आहे. माजी नगराध्यक्ष राहिलेल्या प्रतिस्पर्धी मातब्बर उमेदवारास धक्का देत विजयी झालेल्या या उमेदवाराची जोरदार चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे.
अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये बहुमत मिळवत काँग्रेस पक्षाने तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक मिळवली आहे. तर एमआयएमने तीन जागी विजय मिळवत अर्धापूर नगरपंचायतमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, सध्या चर्चा सुरु आहे ती वार्ड क्रमांक १३ मध्ये विजयी उमेदवाराची. कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष उभे असलेल्या या वार्डात मोठी चुरशीची लढत झाली. येथे एका गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप असलेला शहबाज बेग यांनी एमआयएमकडून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष,मा. नगरसेवक आदी पदे भूषवलेले काँग्रेसचे नासेरखान पठाण हे होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत एमआयएमच्या शहाबाज बेग यांनी ४३३ मते घेत कॉंग्रेस उमेदवारावर ६५ च्या मताधिक्य मिळवत वर्चस्व मिळवले.
उमेदवारी अर्ज भरला नातेवाईकांनीविशेष म्हणजे, नामनिर्देशन फॉर्म एका नातेवाईकाने भरला होता. तर त्याने आपल्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा राबवली. यामुळे या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे. अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. वार्ड क्र. १३ मध्येही असाच प्रकार झाला असून अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे गुप्त हात कॉंग्रेसच्या पराभवामागे असल्याची राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.