मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:47 IST2024-11-28T19:47:13+5:302024-11-28T19:47:37+5:30

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी चव्हाणांची साथ सोडत भाजपत प्रवेश केला होता.

voters teach lesson to Bhaskarro Khatgaonkar who returned to the Congress from the BJP | मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

नांदेड : काँग्रेसकडून तीन वेळेस खासदार अन् पुन्हा भाजपवासी झालेले भास्करराव खतगावकर यांनी आपल्या सूनबाई मिनल खतगावकर यांना राजकारणात स्टॅन्ड करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर पुन्हा काँग्रेसची वाट धरली. रुसवे-फुगवे, अंतर्गत तडजोडी करीत नायगावमधून त्यांनी मिनल खतगावकर यांना रिंगणात उतरविले होते, परंतु या ठिकाणी भाजपच्या राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला, तर दादांचे प्राबल्य असलेल्या देगलूर मतदारसंघातही लोकसभेत भाजपला लीड मिळाली. त्यामुळे पक्षांतरामुळे दादांचाच करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा रंगली आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी नेतृत्व असलेल्या भास्करराव खतगावकर यांनी नांदेड लाेकसभेचे तीन वेळेस प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेसचे ते अशोकराव चव्हाण यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे दिग्गज नेते होते, परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी चव्हाणांची साथ सोडत भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीनगर आणि बाबानगर अशी दोन सत्ताकेंद्रे झाली होती. भाजपची सर्व सूत्रे खतगावकरांच्या निवासस्थानावरून हलत होती, परंतु राज्याच्या राजकारणात सत्तानाट्य झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सार्वजनिक बांधकाममंत्री झाले. त्यामुळे खतगावकर यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसची वाट धरली, परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. त्यावेळी खतगावकर यांनी सून मिनल खतगावकर यांच्यासह पुन्हा हाती कमळ धरले. मिनल यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून दादांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर, आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत नायगावमधून भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठीही फिल्डिंग लावण्यात आली होती, परंतु भाजपकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने अखेर दादांनी सूनबाई मिनल यांच्यासह पुन्हा काँग्रेसचा हात हातात धरला. नायगावमधून मिनल यांना रिंगणात उतरविण्यात आले. त्यावेळी वसंतराव चव्हाण कुटुंबीयांशी खतगावकरांचे बिनसले होते, परंतु दादांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून चव्हाण कुटुंबीयांशी जुळवून घेतले. त्यामुळे मिनल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, असे बोलले जात होते, परंतु वारंवार केलेले पक्षांतर मतदारांना काही रुचले नाही. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आपले वजन भाजपच्या राजेश पवार यांच्या पारड्यात टाकले. मिनल खतगावकर यांचा तब्बल ४७ हजार ६२९ मतांनी दारुण पराभव झाला. या पराभवामुळे आता खतगावकर कुटुंबीयांचे राजकारणात भवितव्य काय? अशी चर्चा होत आहे. त्यांचे वजन असलेल्या देगलूर मतदार संघात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेत काँग्रेसला १ हजार १८० मतांची लीड होती. यावेळी दादा काँग्रेसमध्ये असतानाही या ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला तब्बल १९ हजारांची लीड आहे. त्यामुळे दादांचा या मतदार संघातील प्रभावही ओसरला असल्याचे दिसून आले.

भाजपत राहिले असते, तर मिळाली असती लोकसभेची उमेदवारी
भास्करराव खतगावकर यांच्या सुनेला नायगावमधून भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, परंतु भाजपतच थांबले असते, तर कदाचित लोकसभेची उमेदवारी मिनल यांना मिळू शकली असती अन् त्या निवडूनही आल्या असत्या, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. कारण भाजपकडून लोकसभेसाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू होता. त्यात खतगावकरांचे पारडे इतरांपेक्षा नक्कीच जड होते.

Web Title: voters teach lesson to Bhaskarro Khatgaonkar who returned to the Congress from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.