बामणी फाटा येथे चोरीच्या घटना
हदगाव - हदगाव तालुक्यातील बामणी फाटा येथे चोरीची मालिका सुरू आहे. यात हजारो रुपयांचा माल लंपास झाला. मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. अविनाश कदम यांच्या मालकीची दुचाकी लांबविण्यात आली. करमोडी येथील सुनील पवार यांच्या घरासमोरील दुचाकीही लंपास झाली. मनाठा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
किनवटला दूषित पाणीपुरवठा
किनवट - शहरातील विविध भागात नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. पिवळ्या रंगाचे पाणी येत आहे. दरमहा लाखो रुपये पाणी शुद्धीकरणासाठी खर्च केले जातात. नेमका हा खर्च जातो कुठे असा सवाल लोकांचा आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारीत पालिकेच्या कारभाराबद्दल रोष दिसून येतो.
पत्रकारांचे निवेदन
किनवट - येथील एका पत्रकाराविरूद्ध सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली. ती नोटीस पोहाेचण्याआधीच समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आली. अशी नोटीस काढणे म्हणजे पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे अशा भावना पत्रकारांनी व्यक्त केल्या. सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांची पत्रकाराच्या शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले. यावेळी अनेकांची उपस्थिती हाेती.
शहापूर येथे कडबा जळाला
देगलूर - तालुक्यातील शहापूर येथील जनावराच्या गोठ्यातील कडब्याला आग लागून नुकसान झाले. यात जीवितहानी झाली नाही. शेतकऱ्याचे २५ हजारांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. या दरम्यान कडबा पेंडी व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे २५ हजारांच्या वर नुकसान झाले.
बाभळीकर कुटुंबीयांचे सांत्वन
हदगाव - काँग्रेसचे अनिल पाटील बाभळीकर यांचे वडील गोपाळराव पाटील बाभळीकर यांचे मागील महिन्यात निधन झाले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बुधवारी बाभळीकरांच्या हदगाव येथील निवासस्थानी भेट देऊन अनिल पाटील यांची भेट घेतली व सांत्वन केले. यावेळी माजी खा. सुभाष वानखेडे, आ. माधवराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.
काळ्या फिती लावून काम
कुंडलवाडी - येथील नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामकाज केले. संघटनेचे अध्यक्ष जी.एस. पत्की, उपाध्यक्ष धोंडीबा वाघमारे, सचिव माराेती करपे, विश्वास लटपटे, सुभाष निलावार, प्रकाश मोरे, हेमचंद्र वाघमारे, प्रतीक माळवदे, मोहन कपाळे आदींनी यात सहभाग नोंदवला.
अवैध दारू विक्री
हिमायतनगर - शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. कोरोनाच्या काळात बंदी असतानाही दारू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात दारूची विक्री करत आहेत. काही दिवसांपासून याबाबत तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दरम्यान युवा वर्ग, शेतकरी, मजूरदार दारूच्या व्यसनाकडे वळले आहेत. वाळकेवाडी येथे छापा टाकून पोलिसांनी अवैध दारू जप्त केली होती.
भीम टायगर सेनेचे आंदोलन
भोकर - लॉकडाऊन विरोधात भोकरमध्ये भीम टायगर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत असल्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड यांनी नमूद केले. जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनकांबळे, तालुकाध्यक्ष प्रतीक कदम यांनीही लॉकडाऊनला विरोध केला.
येसगी पुलासाठी १८८ कोटी रुपये
बिलोली - केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील अनेक विकास कामांसाठी निधी दिला. त्यात नांदेड जिल्ह्यातील येसगी जवळील मांजरा नदीवर नवीन पूल उभारणीसाठी तब्बल १८८.६९ कोटी रुपयांची तरतूद केली. हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ कामाचा हिस्सा असणार आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले. दरम्यान या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातून दक्षिणेत जाणारे व्यापारी, उद्योग आदींसाठी वाहतूक सुरळीत होऊ शकेल.