नांदेड : कोणतीही पूर्व सूचना न देता विडी उद्योग बंद करुन ४०० ते ५०० कामगारांची उपासमार करणाऱ्या आर.एन. चांडक विडी उद्योगावर कारवाई करण्याची मागणी इंडस्ट्रीयल वर्कर्स युनियनच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर २१ डिसेंबरपासून धरणे आंदोलन केले जात आहे.
नऊ वर्षे सुरू असलेला विडी उद्योग ३१ ऑक्टोबर पासून अचानक बंद करण्यात आला. या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त यांनी संघटना व व्यवस्थापन प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत कारखाना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी समुहाचे मालक कामगार व संघटना प्रतिनिधींची बैठक घ्यावी. कारखाना पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात ॲड. प्रदीप नागापूरकर, कॉ. के.के. जांबकर, कॉ. श्याम सोनकांबळे, कॉ. गौतम सुर्य, कॉ. गणेश सदुपटला, कॉ. पद्मा तुम्मा, कॉ. शारदा गुरुपवार, कॉ. मीरा चौधरी आदींचा सहभाग आहे.