कामगारांना कामावर घ्या
नांदेड : अतिक्रमण विभागातील १३ कर्मचा-यांना पूर्वसूचना न देता १८ फेब्रुवारी २०२१ रोजी कामावरून काढण्यात आले आहे. या कामगारांना तत्काळ कामावर घेण्यात यावे व संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांना अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. कपिल वाठोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सभापती, उपसभापतींची ३० मार्च रोजी निवड
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या निवडीसाठी मंगळवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनटकर यांना प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आदेशाद्वारे दिली. शिक्षण, महिला व बालकल्याण समितीची मुदत संपल्यामुळे नवीन ११ सदस्यांची नुकतीच सर्वसाधारण सभेत महापौर मोहिनी येवनकर यांनी निवड केली होती.
परीक्षा केंद्रात प्रतिबंध
नांदेड - राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) रविवारी २१ मार्च रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी १२ आणि दुपारी दीड ते दुपारी ३ या कालावधीत होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. इपनइटणकर यांनी लागू केले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा ११ केंद्रांत होणार आहे. केंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे.