साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यिकाला दरवर्षी मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी श्रेष्ठ कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे. ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय पुरस्कार ठाणे येथील चांगदेव काळे यांच्या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘गंध आणि काटे’ या कथा संग्रहाची निवड करण्यात आली आहे. ७ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील दोन साहित्यिकांना िविभागून देण्यात येणार आहे. डॉ. श्रीनिवास पांडे यांनी लिहिलेल्या आणि औरंगाबादच्या रजत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मराठीतील हरिश्चंद्राख्याने एक अभ्यास’ या संशोधनपर ग्रंथाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ३ हजार रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नायगाव येथील कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘माती शाबूत राहावी म्हणून...’ या कवितासंग्रहाची प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रुपये ३ हजार रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रा. भु.द. वाडीकर आणि प्रा.डॉ. मथु सावंत यांच्या परीक्षण समितीने ह्या पुरस्कारांची निवड केली. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाइमय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्कारांचे हे २० वे वर्ष आहे. दरवर्षी समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार घरपोच पाठविण्यात येणार आहेत, असे प्रतिष्ठानने कळविले आहे.