नांदेड : नागपूर-बाेरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे यवतमाळ, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काम पूर्णत्वास जाण्यासाठी मार्च २०२३ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २४० किमी लांबीच्या या मार्गाचे काम आता मे पासून सुरू झाले आहे. नागपूर-बाेरी-तुळजापूर हा ५५० किमीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यातील बाेरी ते महागाव पर्यंत सुमारे ३१० किमी मार्गाचे चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दिलीप बिल्डकाॅन या एकाच कंपनीने चारही पॅकेज घेऊन हे काम पूर्ण केले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ते लातूर जिल्ह्यातील औसा या २४० किमीच्या महामार्गाचे काम रखडले हाेते. या कामांचे चार पॅकेज करण्यात आले आहेत. त्यातील महागाव ते वारंगा फाटा हे काम सद्भाव कंपनीला देण्यात आले. इतर तीन कामांचे पॅकेज औरंगाबाद व कल्याणच्या कंपनीकडे आहे. कल्याणच्या कंपनीकडे चाकूर-लाेहा-वारंगा हे दाेन पॅकेज आहेत. महागाव ते औसा या मार्गातील ९० टक्के भूसंपादन झालेले आहे.
चाैकट....
ऐन पावसाळ्यात वाढला त्रास
काेराेना, लाॅकडाऊन अशा अडचणींमुळे हे काम थांबले हाेते. यावर्षी मे पासून या कामाला सुरूवात झाली आहे. विकास कामे सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. त्यातच पावसाळ्यात या अडचणींमध्ये आणखी भर पडते. हे काम विलंबाने सुरू झाले असले तरी गतिमानतेने पूर्ण केले जाईल, असे सांगितले जाते.
चाैकट....
चार ठिकाणी हाेणार वसुली
मार्च २०२३ पर्यंत महागाव ते औसा पर्यंतचे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंत्राटदार कंपन्यांना निश्चित करून देण्यात आले आहे. २४० किमीच्या या मार्गावर लातूर जिल्ह्यातील आष्टापूर, नांदेडमधील माळेगाव यात्रा, अर्धापूर तालुक्यातील पार्डी आणि महागाव तालुक्यातील बिजाेरा या चार ठिकाणी टाेल टॅक्स वसुली नाके उभारले जाणार आहेत.
आठपैकी चार पॅकेज पूर्ण
नागपूर ते तुळजापूरपर्यंत महामार्ग निर्माणाचे एकूण आठ पॅकेज आहेत. त्यापैकी चार पूर्ण झाले आहेत. साडेतीन ते चार हजार काेटी रूपये या महामार्गाचे बजेट आहे. या मार्गावरील अर्धवट स्थितीत असलेली कामे पूर्ण करून वेगवान कनेक्टिविटी निर्माण केली जाणार आहे.
काेट
२४० किमीच्या महागाव ते औसा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील अडचणी तातडीने साेडवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाईल.
- सुनील पाटील,
प्रकल्प संचालक,
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, नांदेड