लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : यावर्षी नियोजित वेळेपूर्वी हजेरी लावलेल्या दमदार पावसाने सामान्यांसह शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला असला तरी मागील आठ दिवसांपासून पावसाने खंड दिला आहे. परिणामी, बळीराजा चिंतातूर झाला असून शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.यंदा राज्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अनेक भागात पाण्याअभावी संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यावर्षीच्या मोसमात पावसाने वेळेपूर्वी काही दिवस अगोदरच जोरदार लावली. त्यामुळे सुरूवातीला झालेल्या दमदार पावसावरच काही शेतक-यानी पेरणींच्या कामांना सुरूवात केली. परंतु, मागील आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतक-यांची चिंता आता वाढली आहे.दरम्यान, मशागतींची सर्व कामे आटोपून सुरूवातीलाच झालेल्या पावसावर काही शेतकºयांनी पेरणींची कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पेरणी केलेल्या शेतक-यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता त्यांना भेडसावत आहे.रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मृग नक्षत्राची सुरुवात होईपर्यंत जिल्ह्यातही पावसाचे जोरदार आगमन झाले. परंतु, त्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळे शेतक-यांच्या नजरा आता आकाशाकडे आहेत.
बळीराजा पेरणीसाठी सज्जयावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला. त्यामुळे मागील काही वर्षानंतर यावर्षी तरी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, शेतक-यांनी मशागतीची कामे वेगाने केली. तसेच जमेल त्या परिस्थितीत खते, बियाणांचे नियोजनही केले. दरम्यान, शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दांडी मारल्याने सामान्यांसह शेतक-यांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.---ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढमागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा जवळपास ३६ ते ३८ अंशापर्यंत गेला आहे. परिणामी, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने सामान्य नागरिकांसह शेतक-यांचीही चिंता वाढविली असल्याचे बोलले जात आहे.