नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर मार्गे महाराष्ट्रात येणार आहे. तब्बल पाच दिवस नांदेडात ही यात्रा आहे. त्यामध्ये दररोज किमान २५ किलोमीटर राहुल गांधी हे पायी चालणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत पायी चालण्यासाठी नांदेड शहरातील काँग्रेस नेत्यांनी पहाटेच्या वेळी सरावास सुरुवात केली आहे. बुधवारी पहाटे खुद्द माजी मुख्यमंत्री हे पायी चालण्याचा सराव करीत होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हजारो जण दररोज पायी अंतर कापत आहेत. राहुल गांधी हे स्वत: फिट असून ते न थकता यात्रेत पायी चालत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाल्यानंतर स्टॅमिना टिकून रहावा यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते अन् पदाधिकारी व्यायामाला लागले आहेत. बुधवारी पहाटे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर यांच्याासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि नांदेडकरांनी विमानतळ रस्त्यावर वॉक केला. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढला.
जेवढे शक्य होईल तेवढे चालणारराहुल गांधी हे दररोज साधारणत: २५ किलोमीटर पायी चालत आहेत. ते फिट असून धावतात, व्यायाम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत चालायचे तर सर्वांनाच तशी सवय करून घ्यावी लागेल. त्यासाठी चालण्याचा सराव करीत आहोत. किती किलोमीटर चालणार हे नक्की नाही. मात्र जेवढे शक्य होईल तेवढे चालणार, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली. तसेच ‘मै अकेला चला था और कारवा बनता गया’ हा डायलॉगही त्यांनी मारला.