कंधार : शहरातील जि.प.मुलांचे हायस्कूल, कंधार. मैदानावर जंगी कुस्त्याची दंगल रंगली. नामवंत मल्लांचा सहभाग होता.परंतु, मुलीच्या सहभागाने कुस्तीप्रेमींनी रणरागिणीच्या धाडस, चिवट, चपळाई, झुंज, डावपेचांना भरभरून दाद दिली. रणरागिणींनी कुस्ती दंगल गाजवली असेच एकंदरीत चित्र होते.शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेला भाग कुस्तीप्रेमीच्या गर्दीने फुलून गेला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती दंगल लक्षवेधी ठरली. पहिल्यांदाच शहरात पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढत मुलींनी सहभाग घेत विक्रम केला. महिमा राठोड (पुसद), पायल बनसोडे (लातूर), पूजा बनसोडे, आदिती सगर, धनश्री तळेकर, दिव्या वाघमारे या मुलींचा सहभाग नवीन मल्लांना प्रेरणादायी ठरला. पूजा बनसोडे व ओमकार केंद्रे या लढतीचा आखाड्यातील प्रेक्षकांनी आनंद घेतला. मुलीच्या कुस्त्याची दंगल पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते अॅड.मुक्तेश्वर धोंडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे ज्येष्ठ नेते चन्नावार, जि.प.सदस्य दशरथ लोहबंदे, जि.प. सदस्या प्रा.डॉ. संध्या धोंडगे, पं.स.सभापती सत्यभामा देवकांबळे, नगरसेविका वर्षा कुंटेवार, नगरसेवक अ.मन्नान चौधरी, शहाजी नळगे, विनोद पापीनवार, सुधाकर कांबळे, उपसभापती भीमराव जायभाये, पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, गणेश कुंटेवार, सत्यनारायण मानसपुरे, बाबाराव पा.शिंदे, आबासाहेब नाईक, पंडित देवकांबळे, पंडीत पा.पेठकर, सरपंच माधवराव पेठकर, उपसरपंच उत्तम भांगे, गुरूनाथ पेठकर, सुधाकर कौसल्ये, स्वप्निल गारोळे आदींची उपस्थिती होती.अखेरची कुस्ती योगेश मुंडकर व अच्युत टरके यांच्यात झाली. परंतु, ही तुल्यबळ लढत बरोबरीत सोडण्यात आली. तसेच दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती परमेश्वर जगताप व अफजल यांचीही बरोबरीत सुटली. पंच म्हणून प्रा. शिवराज चिवडे, प्रा. डॉ. गंगाधर तोगरे, बी. डी. जाधव, हणमंत शेंडगे, संभाजी मुंडे, वामन नागरगोजे, गीते, जाधव यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी शिवसेना कंधार ता. प्रमुख माधव मुसळे, लोहा ता. प्रमुख संजय ढाले आदींनी परिश्रम घेतले. दिवसरात्र विद्युतझोतात खेळविलेल्या कुस्तीच्या दंगलीना कुस्तीप्रेमीची मोठी उपस्थिती होती.